प्रबोधिनी एकादशी: २५ नोव्हेंबर २०२० आणि तुलसीविवाहरंभ: २६ नोव्हेंबर २०२०
  • दिनांक २५ नोव्हेंबर २०२०: प्रबोधिनी एकादशी – देव उठनी एकादशी – विष्णू प्रभोधोत्सव – कार्तिक शुक्ल एकादशी.
  • दिनांक २६ नोव्हेंबर २०२०: भागवत एकादशी तुलसीविवाहरंभ – चातुर्मास्य समाप्ती.

मुहूर्त आणि स्मार्त किंवा भागवत उपवास

  • एकादशी तिथी आरंभ: दिनांक २५/११/२०२० च्या पहाटे २:४४.
  • एकादशी तिथी समाप्ती: दिनांक २६/११/२०२० च्या पहाटे ५:१० पर्यंत एकादशी आहे नंतर द्वादशी तिथी लागत आहे.
  • द्वादशी तिथी समाप्ती: २७/११/२०२० च्या पहाटे ७:४८ ला.
  • एकादशी उपवास दिनांक २५/११/२०२०
  • एकादशी पारण – २६/११/२०२० (उपवास सोडणे) दुपारी १:३३ ते ३:४६ पर्यंत.
  • वैष्णव एकादशी उपवास दिनांक २६/११/२०२०
  • एकादशी पारण – २७/११/२०२० (उपवास सोडणे) सकाळी ६:५३ ते ७:४६

केव्हा केव्हा दोन्ही दिवशी एकादशी असते एक स्मार्त आणि दुसऱ्या दिवशी भागवत.

वाचनात असल्याप्रमाणे स्मार्त एकादशी हि पारिवारिक सांसारिक जनमानसाला असते. आणि संन्यासी विधवा आणि मोक्षप्राप्तीची इच्छा करणाऱ्यांसाठी भागवत एकादशी असते.

तसे आपण कोणतीही एकादशी करू शकता जी रीती तुमच्याकडे पहिल्यापासून असेल.

प्रबोधिनी एकादशी महत्व

पुराणाच्या आख्यायिकेप्रमाणे विष्णू आषाढी एकादशी पासून चातुर्मासात ४ महिन्यासाठी पाताळ लोकी राजा बळीच्या सेवेत असतो. काही ठिकाणी हि त्याची योग निद्रा सुद्धा असते असे म्हटले आहे. ह्या निद्रेतून विष्णू भगवान हे पुन्हा जागे होतात आणि म्हणून ह्याला देव उठनी आणि प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात.

कार्तिक शुक्ल एकादशी ला भगवान जागे होत असताना ह्या एकादशी चे महत्व फार असते. आपल्या महाराष्ट्रात येथे पंढरपूर यात्रेला फार महत्व आहे. जेथे विष्णू चेच एक रूप म्हणून विठ्ठलाला पुजले जाते.

ह्या एकादशी च्या दुसऱ्या दिवसापासून सर्व शुभ कार्य सुरु होतात. ह्या एकादशी चे जो कोणी व्रत करेल त्यास वैकुंठ प्राप्ती होते असे म्हटले आहे

शाळीग्राम ची कथा आणि विष्णूला तुळशी का प्रिय आहे आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वितीयेपासून तुलसी विवाहाला प्रारंभ होतो त्याचे अध्यात्मिक महत्व याबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते.

शाळीग्राम ची कथा

जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस होता आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू-संतांना पार त्राही त्राही करून सोडलेले होते. त्याला कसे रोखायचे, असा प्रश्न सर्व देवांना पडला.

मग देव विष्णूला शरण जाऊन जालिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती करतात. विष्णूनी जेव्हा जालिंदराबाबत माहिती काढली, तेव्हा त्यांना असे कळते की, त्याची पत्नी वृंदा ही सतीपतीव्रता असते. तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यांनेच जालिंदर विजयी होत असतो. त्याला पराजित करायचे असेल, तर वृंदाच्या पतिव्रत्याचा भंग करणे हाच उपाय उरतो. ते करण्यास कुणीही धजावत नाही.

अखेर ती जबाबदारी विष्णू स्वीकारतात. जालिंदराचे रूप धारण करून विष्णू वृंदेच्या महालात जातात. आपले पती आले आहेत असे समजून वृंदा त्यांना अलिंगन देते. तिच्या पतिव्रत्याचा भंग होताच, जालिंदराचा मृत्यू होतो. देवांनी मारलेल्या बाणाने त्याचे शीर तुटते आणि ते वृंदेच्या दारात पडते.

नव-याचे शीर पाहताच वृंदा चकीत होते आणि विष्णूला विचारते, तू कोण आहेस? त्यावर विष्णू आपले ख-या रूपात प्रकटतात. संतप्त झालेली वृंदा विष्णूला तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला, तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल, असा शाप देते.

भगवंत तिची क्षमा मागतात. तेव्हा वृंदा म्हणते, तू मला आता भ्रष्ट केलेस, आता मला कोण स्विकारील? तेव्हा भगवंत म्हणतात, ‘मी तुझा स्वीकार करतो. इतकेच नव्हे तर जे तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल.’ त्यानंतर वृंदा सती गेली.

पुढे तिच्या शापामुळेच राम अवतारामध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला. देव दगड होऊन पडले. त्यालाच ‘शालिग्राम’ म्हणतात. ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले, तिथे तुळशीचे रोप उगवले. तीच ही तुळस.

वृंदेच्या नावावरूनच ज्या ठिकाणी तुळस लावली जाते, त्याला ‘वृंदावन’ असे म्हटले जाते. तीच तुळस कृष्णाने,पांडुरंगानेही धारण केली. तिला भगवंताने स्वीकारले याचे प्रतीक म्हणून ‘शालिग्राम’ हा जो दगड आहे, त्याला देव मानून त्याचा विवाह तुळशीसोबत लावला जातो. ती भगवंतांची प्रिय होते, म्हणूनच तिला धारण करणा-यांवर भगवंत प्रेम करतो, अशी श्रद्धा आहे. याच विचाराने वारक-यांनीही तुळशीला आजतागायत पूजनीय मानले आहे.

धन्यवाद…..!

Leave a Reply