You are currently viewing धनत्रयोदशी, प्रदोष व्रत, धन्वन्तरी जयंती, यम दीपदान : दिनांक १३ नोव्हेंबर २०२०

धनतेरस पूजा मुहूर्त

संध्याकाळी ५:२७ ते ६ पर्यंत

धन्वन्तरी जयंती

पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी शरद पूर्णिमेला चंद्र, कार्तिक द्वादशी ला कामधेनू गाय, त्रयोदशी ला धन्वन्तरी, चतुर्दशी ला काली माता आणि अमावास्येला देवी लक्ष्मी प्रकट झाली होती.

धनतेरस ला भगवान धन्वन्तरी चा प्रकट दिन म्हणून मानला जातो जेव्हा ते प्रकट झाले तेव्हा त्यांच्या एका हातात एक अमृत कलश होता. अमृत हि एक संजीवनी असते आणि म्हणून त्या दिवसापासून आयुर्वेदाचा प्रसार मानला जातो.

ह्यामुळे एक प्रथा आली कि प्रत्येक कुटुंबाने एक तरी असे नवीन भांडे ह्या दिवशी विकत घ्यावे जेणे करून त्यात अमृत आहे असे मानून ज्याला आरोग्याचा त्रास असेल त्याने ते वर्षभर वापरावे. ह्याने त्यास आरोग्य समृद्धी मिळते असा समज आहे.

आपल्या घरातील लहान मुलांसाठी ह्यात एखादा पाणी पिण्याचा ग्लास अथवा एखादे जेवणाचे ताट, चमचा चांदी अथवा पितळेचा जरूर घ्यावा.

ह्यात जे भांडे विकत घेतात त्याला प्रथम घरात आणून स्वच्छ करून धन्वन्तरी ची पूजा करून देवाला त्या भांड्यात एखादा गोड पदार्थ नैवेद्य दाखवावा आणि त्याचा वापर हा दुसऱ्या दिवसापासून करण्यास घ्यावा.

आपण ह्या दिवशी ॐ धन्वंतरये नमः॥ हा जप १०८ वेळा करून भगवान धन्वन्तरी चा आशीर्वाद प्राप्त करावा. ज्यास आरोग्य समृद्धी ची सध्या खूप आवश्यकता आहे अशा व्यक्तींनी हा जप जरूर करावा आणि त्याची प्रचिती घ्यावी. घरातल्या मुख्य व्यक्तीने आपल्या कुटुंबाचे आरोग्य नीट राहावे म्हणून सुद्धा जप करण्याची परंपरा आहे.

पाटावर जरीचे कापड घालून धन्वन्तरी देवतेची मूर्ती अथवा फोटो मांडून त्याची पूजा करावी धूप दीप दाखवून कडुलिंबाचा पाला त्यात खडीसाखर ठेऊन नैवेद्य दाखवावा. किंवा एखादा गोड पदार्थ दाखवून त्यानंतर धन्वन्तरी चा जप करावा.

कुबेर पूजन

ह्यात कुबेर मूर्ती किंवा कुबेर यंत्राची पूजन विधीचा प्रकार आहे. ह्या दिवशी कुबेर यंत्र सिद्ध करून ते लक्ष्मी पूजन दिवशी पूजेत ठेवावे. सिद्ध करण्यासाठी बाजारातून ह्याच दिवशी एक चांदी अथवा तांब्यावर कोरलेले कुबेर यंत्र घेऊन यावे. एका लाल कपड्यावर त्यास स्थापित करून त्याची धूप दीप नैवेद्य दाखवून पूजा करावी. पूजनात नेवैद्य म्हणून सफेद मिठाई दाखवावी आणि मंत्र जप करावा.

ह्या दिवशी शुभ मुहूर्त पाहून लक्ष्मी पूजनासाठी प्रतिमा यंत्र पूजेच्या वस्तू विकत घ्याव्यात. दिवाळीच्या पुढील दिवशी जे जे लागेल ते ते नवीन विकत घेण्याची परंपरा आहे.

खास टीप — ह्या दिवशी कोणालाही उधार देऊ नये.

ह्या दिवशी व्यापारी वर्ग आपल्या तिजोरी, धन ठेवण्याची जागा, हिशोबाच्या वह्यांची पूजा सुद्धा करतात त्यावर स्वस्तिक काढून फुले वाहून त्याची पूजा करण्याची पद्धती आहे. ह्या दिवसापासून व्यापारी वर्ग नवीन हिशोब वहीची सुरुवात सुद्धा करण्याची पद्धती आहे. व्यापारी वर्ग ज्या गादीवर बसतात ती गादी लावण्यासाठी विशेष दिवस असतो हा.

कुबेर पूजन करण्याच्या अगोदर गणेश लक्षमी ची पूजा करून घ्यावी आणि नंतर कुबेर पूजन घरातील किंवा दुकानातील उत्तरेस करावी आपले मुख हे उत्तर दिशेलाच असावे. काही ठिकाणी जर कुबेर मंत्र सिद्ध करायचा असेल तर दक्षिणेला मुख करून हा मंत्र सिद्ध करण्याची पद्धती दिली आहे.

विनियोग- एक पंचपळी अथवा चमच्यात पाणी घेऊन खालील विनियोग मंत्र एकदाच जपून ते पाणी खाली सोडावे.

अस्य श्री कुबेर मंत्रस्य विश्वामित्र ऋषी:बृहती छंद:
शिवमित्र धनेश्वर देवता समाभीष्ट सिद्द्यर्थे जपे विनियोग:

विनियोग झाल्यावर मंत्राला सुरुवात करावी. १/५/११ माळा जप करण्यास हरकत नाही.

ऊं यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धन धन्याधिपतये धन धान्य समृद्धिं मे देहि दापय स्वाहा.

यमदीपदान

यम दीप दान म्हणून सायंकाळी घरातील स्त्रियांनी तिन्ही सांजेला एक मातीचा दिवा मुख्य दरवाजात जरूर लावावा त्याची वात हि दक्षिणेला असावी आणि तो दिवा पूर्ण रात्रभर पेटेल ह्याची व्यवस्था करावी . यम देवतेला आपल्या घरातील सर्व व्यक्तींच्या रक्षणाबद्दल प्रार्थना करावी.एखादे फूल वाहून नमस्कार करावा.

असे केल्याने अपमृत्यु घरात होत नाही असे म्हणतात त्या दिव्याच्या बाजूला नैवेद्य म्हणून एका वाटीत थोडे पाणी आणि बाजूला चिमूटभर गूळ ठेवावा ह्या दिव्यात एक नाणे किंवा कवडी सुद्धा टाकण्याची परंपरा आहे. हा दिवा लावल्यानंतर जर पॉसिबल असेल आणि तुम्ही बाहेर जात असाल तर बाहेच्या बाहेर एखादी लोखंडी वस्तू (तवा चिमटा डाव वगेरे ) गरिबाला दान करावी.पण ती लोखंडी वस्तू घरात आणू नये. कारण ह्या दिवशी कोणतीही लोखंडी वस्तू किंवा काचेची सुद्धा वस्तू घरात किंवा स्वतःसाठी विकत घेत नाहीत.

काही जण ह्या दिवशी नवीन गाडी घरी घेऊन येतात माझ्या मते बलिप्रतिपदेला घेऊन यावे ह्या दिवशी गाडी आणू नये.

हा दिवा लावताना खालील मंत्र जरूर म्हणावा.

‘मृत्युना दण्डपाशाभ्यां कालेन श्यामया सह ।
त्रयोदश्यां दीपदानात्‌ सूर्यजः प्रीयतां मम ॥’

दुसऱ्या दिवशी अभ्यंग स्नानापूर्वी तो विझलेला दिवा उचलून पिंपळाच्या झाडाखाली ठेऊन यावा आणि नंतर अंघोळ करावी. तसे करण्यास असमर्थ असाल तर बाहेर कुठेही ठेवावा नंतर तो कधीही पाण्यात सोडावा मात्र घरात आणून ठेऊ नये.

प्रदोष

प्रदोष काल : सायंकाळी ६:०१ ते ८:३३ पर्यंत.

त्रयोदशी ला प्रदोष व्रत सुद्धा असते त्यामुळे प्रदोष काळी शिव पूजन जरूर करावे. प्रदोष च्या अधिक माहितीसाठी जसे पूजन आणि महत्व यासाठी खालील लिंक वर क्लिक करून जरूर वाचन करावे. अगदीच जमत नसेल तर ह्या दिलेल्या वेळेत एक तुपाचा दिवा शिवपिंडी जवळ ठेऊन यावे.

प्रदोष व्रत विशेष

https://shreedattagurujyotish.com/pradosh-vrat-vishesh/

आपणा सर्वाना भगवान धन्वंतरी कडून चांगले आरोग्य लाभो , कुबेर आपल्यावर धनाचा वर्षाव करो, लक्ष्मी आपल्या सुखसमृद्धीत वाढ करो हीच देवाकडे प्रार्थना.

धन्यवाद…..!

Leave a Reply