You are currently viewing कुंडली गुणमिलन मध्ये गण काय असते?

कुंडली गुणमिलन मध्ये गण काय असते?

कुंडलीपत्रिका गुणमिलन करताना ३६ पैकी ६ गुण देणारा हा विषय अति महत्वाचा ठरतो. कारण ह्या गण मध्ये मनुष्य त्याच्या पूर्ण आयुष्यात कसा वागेल कसा व्यवहार करेल, त्याचे गुण अवगुण त्याला कसे राहायला लावतील ह्याचे निदान करता येते.

आधी ह्याची संपूर्णतः माहिती देतो.

कोणत्या गणातील व्यक्ती कसा असेल?

देव गण

सात्विक प्रधान, भावुक उदार दानी माता पित्याचा भक्त, ज्ञानी, गुरु भक्त, देवभक्त, अवगुणांचा अभाव, (आले तरी त्याला व्यक्त करण्याची डेरिंग नसते), देवगणातील व्यक्ती परीस्तीशी लढतो पण गरज असेल तर परिस्थितीनुरुप स्वतःला त्या परिस्थीती सारखे बदलून घेतो. देव गणातील लोक परिस्थिती पाहून शांत होतात.

मनुष्य गण

रजोगुण प्रधान, विचारशील व्यवहार कुशल , शांत, भोग-आणि भौतिक वादी, परिस्थिती अनुसार कार्य करणारा, वाईट/स्वार्थी, लोभ, भौतिक वादी, कर्मावर जास्त लक्ष देणारा, भूत भविष्य ह्यावर जास्त अवलंबून न राहता फक्त कर्म करत राहण्यावर ह्यांचा विश्वास असतो. हे लोक जीवनात स्थिर असतात जास्त धावपळ करत नाहीत स्वभावाने चांगले, कोणाविषयी जास्त वाईट चांगले विचार करत नाहीत. संततीवान , ह्यात राक्षस गण आणि देवगण ह्याचे संमिश्र मिश्रण म्हणजे मनुष्य गण.

देवगणातील आणि राक्षस गणातील जे जे लिहिले आहे त्याचे मिश्रित फळ मनुष्य गणला मिळते.
परिस्थिती पाहून स्वतःला स्वतःच्या स्वार्थासाठी जो नेहमी बदलत राहतो तो मनुष्य गणातील व्यक्ती असतो.

राक्षस गण

तमोगुण प्रधान — तामसिक प्रवृत्ती जास्त असल्याने धूर्त स्वार्थी, क्रोध, कठोरता, ईर्षालू, कटुभाषी, चरित्रहीन, आक्रमक, ह्यातले काही काही गुण असू शकतात. नकारात्मक विचार करणारे, नेहमी कॉम्पिटिटिव्ह, निगेटिव्ह ऊर्जा ह्याच्याकडे जास्त असते, इच्छाशक्ती जास्त असल्यामुळे जिद्दी चिकाटी प्रवृत्ती वाढत जाते, स्वतंत्र विचारसरणी असल्यामुळे कुणाच्या हाताखाली राबणारे नव्हेत,
राक्षस गणातील व्यक्ती परिस्थितीला स्वतासारखे बदलून टाकतो.
राक्षस गणातील लोक शांत होताना आधी क्रोधी असतात.

नक्षत्रावरून आपले गण कोणते?

 • जर आपला जन्म —अश्विनी, मृगशीर्ष, पुनर्वसू, पुष्य, हस्त, स्वाती, अनुराधा, श्रवण, रेवती– ह्या ९ नक्षत्रांपैकी एकात झाला असेल तर आपले देव गण असते.
 • जर आपला जन्म –भरणी, रोहिणी, आर्द्रा, पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा ह्या ९ नक्षत्रांपैकी एकात झाला असेल तर आपले मनुष्य गण असते.
 • जर आपला जन्म –कृतिका, आश्लेषा, मघा, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, धनिष्ठा, शततारका ह्या ९ नक्षत्रांपैकी एकात झाला असेल तर आपले राक्षस गण असते.

कोणत्या गणात किती गुण मिळतात?

मुलामुलींची गण जर खालील प्रमाणे असतील तर आपल्याला खालील गुण मिळतील

 • देव गण – देव गण = ६ गुण
 • देव गण – मनुष्य गण = ६ गुण
 • देव गण – राक्षस गण = ० गुण
 • मनुष्य गण – मनुष्य गण = ६ गुण
 • मनुष्य गण – देव गण = ६ गुण
 • मनुष्य गण – राक्षस गण = ० गुण
 • राक्षस गण – राक्षस गण = ६ गुण
 • राक्षस गण – देव गण = १ गुण
 • राक्षस गण – मनुष्य गण = ० गुण

गण आणि माझे विचार

कोणतेही गण कोणत्याही गणासाठी वाईट नसते मनुष्याला फक्त ३ गण दिले आहेत आणि जगाची लोकसंख्या पाहता असे शक्य नाही होणार कि त्याच गणाच्या व्यक्तीला त्याला लागणारी व्यक्ती मिळेल.

जास्त ह्यात जिद्द करून विवाह मोडू नये. माझ्या मते पती पत्नी च्या आयुष्यात त्यांचे शिक्षण कसे आहे त्यांचे करिअर कसे आहे हे पाहून ह्याचा निर्णय घ्यावा.

ह्यासाठी खालील उदाहरणे देतो

 • देव गण – देव गण : जर देव गण देव गण दोघांचे लग्न झाले तर दोघेही सात्विक असू शकतात एकमेकांना सांभाळून घेऊ शकतात पण कोणत्याही कॉम्पिटिशन, वैवाहिक सुख घेताना लागणाऱ्या टार्गेट मध्ये हे दोघे अति सात्विक पण ह्यांना त्रास देऊ शकते आजकालच्या स्पर्धात्मक युगात ह्या व्यक्ती एक पाऊल मागे दिसतील.
 • देव गण — मनुष्य गण : ह्यात मुलगी जर मनुष्य गणाची असेल तर देव गणाच्या मुलाला चांगली असेल त्याची मनोभावे सेवा करेल. आणि मुलगा मनुष्य गणाचा असेल तर देव गणाच्या मुलीची भक्ती करेल. हे कॉम्बिनेशन सर्वात चांगले पण देव गणाच्या मुलाने मनुष्य गणाच्या मुलीबरोबर राहताना पैसा हा विषय थोडा हैराण करणारा असू शकतो.
 • देव गण – राक्षस गण : ह्यात थोडे इशू होतात कारण एका घरात मनुष्य आणि राक्षस हे दोघे एकत्र राहताना त्रास पाहिले गेले आहेत. ह्यात राक्षस गण असणाऱ्या व्यक्तीने जरा समजून राहिले तर संसार उत्तम होऊ शकेल. आणि देव गणाच्या व्यक्तीने राक्षस गणाच्या व्यक्तीच्या टार्गेट मध्ये ढवळाढवळ न करता संसार केला तर जास्त त्रास होणार नाही.
 • मनुष्य गण — मनुष्य गण : जर दोन्ही पती पत्नी करिअर च्या वाटेवर आपापली प्रगती करत असतील पैसा अडका जमा करत असतील तर हि जोडी संसारासाठी अति उत्तम असेल.
 • राक्षस गण — मनुष्य गण : ह्यात सुद्धा थोडे इशू होण्याचा संभव असतो दोघांच्या आचारविचारांचा. राक्षस गणाचा मनुष्य गणाच्या व्यक्तीवर जास्त प्रभाव असतो. त्यामुळे मनुष्य गणला इथे त्रास होण्याचा संभव नाकारता येत नाही. तरी सुद्धा लग्न करायचेच असेल तर दोघांचे वरील प्रमाणे स्वभाव जुळवूनच लग्न करावे.
 • राक्षस गण – राक्षस गण : ह्यांनी विवाह केला तर ह्यात दोघांचे विवाहानंतर च्या टार्गेटवर चांगले काम झालेले पाहता आले आहे. पैसा प्रॉपर्टीज मिळविण्यास ह्या जोड्या ऊत्तम. पण एकत्र कुटुंबात राहताना ह्या जोडप्याना त्रास झालेला दिसतो. ह्या पती पत्नीने संसार करताना आपापल्या नातेवाईकांचा जास्त प्रभाव आपल्या संसारावर नसावा असे माझे मत आहे. कारण एकत्र कुटुंबात घरातील मनुष्य गण आणि देव गणातील व्यक्तीचा ह्या दोघांना त्रास होऊ शकतो.

शेवटी असे निदर्शनात आले आहे कि गण पाहताना दोघांच्या लग्नाच्या वयोमर्यादा ला जास्त महत्व दिले पाहिजे. जर लग्न ३० नंतर असेल तर राक्षस गण असणाऱ्या व्यक्तीचे लग्नाच्या अगोदर हे करिअर प्रॉपर्टीज आणि पैसा बॅलन्स ह्यात समाधान असेल तर त्याच्या पत्रिकेतील इतर योग चांगले असतील तर लग्न करण्यास हरकत नाही. राक्षस गणला देव गण मनुष्य गण सुद्धा घातक ठरू शकेल पत्रिकेतील इतर बाबी त्यासाठी योग्य रित्या चेक करून निर्णय घ्यावा.

पण कोणत्याही परिस्थितीत ३२ ते ४० वयाच्या मुलामुलींच्या पत्रिकेत जास्त ह्याला महत्व देणे म्हणजे चांगल्या स्थळाला नाकारणे हि चूक होऊ शकते.हा प्रकार घातक आहे. कारण ह्या वयातील मुलामुलींना एक चांगली मॅच्युरिटी आलेली असेल.

—शेवटी चांगल्या ज्योतिषाचा सल्ला घेणेच हितावह ठरेल—

धन्यवाद…..!

This Post Has 2 Comments

 1. Jayashree Nalawade chiplun

  Sir best information 👍🙏

 2. Rashmi

  How can I calculate my gun

Leave a Reply