You are currently viewing आपल्या पत्रिकेत लकी ग्रह कोणता

सामान्य पणे ज्योतिष शास्त्रात भाग्य स्थानात म्हणजे नवम स्थानात जी राशी असते त्या राशीचा मालक हा आपला भाग्येश म्हणजे लकी ग्रह असतो. पण लाल किताब प्रमाणे सर्वांच्या पत्रिकेत एक ग्रह असा असतो तो पत्रिकेत आपल्या आयुष्याचा लकी ग्रह असतो.

कसा ओळखावा लकी ग्रह?

सूत्र क्रमांक एक

केंद्र स्थानी –प्रथम स्थानात सूर्य (रवी) किंवा चतुर्थ स्थानी गुरु किंवा सप्तम स्थानी शनी किंवा दशम स्थानी मंगळ ह्या चारही स्थानांमध्ये जर एखादा ग्रह त्याच स्थानात लिहिला असेल तर त्यातील तो ग्रह हा भाग्याचा ग्रह असेल.
उदाहरण कुंडली क्रमांक १ पहा — त्यात जिथे सूर्य गुरु शनी मंगळ दाखविले त्यापैकी एक तरी ग्रह त्याच स्थानात असावा. काल पुरुष पत्रिकेत इथे हे चारही ग्रह उच्च राशीत होतात.

वरील नियम जर आपल्या पत्रिकेत बसत नसेल आणि दाखविलेल्या स्थानांत तोच ग्रह नसेल तर आपण सूत्र क्रमांक २ वर जा.

सूत्र क्रमांक दोन

द्वितीय (दुसऱ्या) स्थानी चंद्र , तिसऱ्या स्थानी राहू , सहाव्या स्थानी बुध, नवम स्थानी केतू , द्वादश स्थानी (१२ व्या) शुक्र — ह्यापैकी कोणत्याही एका स्थानात दाखविलेला तोच ग्रह असेल तर तो ग्रह आपल्या भाग्याचा ग्रह आहे असे समजावे.
उदाहरण कुंडली क्रमांक २ पहा. जे ग्रह दाखविले आहेत ते ग्रह काल पुरुष कुंडलीत उच्च राशीत येतात.

वरील नियम जर आपल्या पत्रिकेत बसत नसेल आणि दाखविलेल्या स्थानांत तोच ग्रह नसेल तर आपण सूत्र क्रमांक
३ वर जा.

सूत्र क्रमांक तीन

प्रथम स्थानी मंगळ, दुसऱ्या स्थानी शुक्र , तिसऱ्या स्थानी मंगळ , चतुर्थ स्थानी चंद्र , पंचम स्थानी सूर्य , सहाव्या स्थानी बुध , सातव्या स्थानी शुक्र , अष्टम स्थानी मंगळ , नवम स्थानी गुरु , दशम स्थानी शनी , लाभ स्थानी शनी , बाराव्या स्थानी गुरु.
ह्यापैकी जर एखादा ग्रह आपल्या पत्रिकेत त्याच स्थानी असेल तर तो ग्रह भाग्याचा ग्रह होऊ शकतो.
उदाहरण कुंडली क्रमांक ३ पहा. ज्या ज्या ठिकाणी जे जे ग्रह लिहिले आहेत काल पुरुष कुंडलीत ते स्वतःच्या राशीत असतात.

वरील नियम जर आपल्या पत्रिकेत बसत नसेल आणि दाखविलेल्या स्थानांत तोच ग्रह नसेल तर आपण सूत्र क्रमांक ४ वर जा.

सूत्र क्रमांक चार

१) नवम स्थानात जो ग्रह लिहिला असेल तो ग्रह भाग्याचा समजावा
२) नवम स्थान रिकामी असेल तर तिसऱ्या स्थानात जो ग्रह लिहिला असेल तो
३) तिसरे स्थान रिकामी असेल तर ११ व्या स्थानात जो ग्रह लिहिला असेल तो
४) लाभ स्थान रिकामी असेल तर पंचम स्थानात जो ग्रह असेल तो
५) पंचम स्थानात एकही ग्रह नसेल तर दुसऱ्या स्थानात जो ग्रह असेल तो
६) दुसऱ्या स्थानात एकही ग्रह नसेल तर ६ व्या स्थानात जो ग्रह असेल तो
७) ६ व्या स्थान जर रिकामी असेल तर १२ व्या स्थानी (द्वादश) जो ग्रह लिहिला असेल तो
८) १२ व्या स्थानी एकही ग्रह नसेल तर अष्टम स्थानी जो ग्रह असेल तो आपल्या भाग्याचा लकी ग्रह ओळखावा.
असे क्रमवार पाहत चलावे

हे सर्व पाहताना खालील नियमांचा विचार जरूर करावा

  • नियम १ :- आपल्या पत्रिकेत सूत्र क्रमांक १ लागू पडले तर पुढील सूत्राचा विचार करू नये. १ ले सूत्र लागत नसेल तर दुसऱ्यात जावे दुसरे लागू नसेल तर तिसऱ्याच विचार करावा सर्वात शेवटी सूत्र क्रमांक ४ पाहावे जेव्हा वरील तीनही सूत्रांमध्ये एकही ग्रह आपल्या पत्रिकेत नसेल तेव्हाच.
  • नियम २ :- हे पाहताना आपल्या पत्रिकेत फक्त स्थानांचा विचार करावा त्यात कोणत्याही नंबर चा विचार करू नये.
  • नियम ३ :- तसेच त्या ग्रहाबरोबर कोणताही ग्रह बसला असेल तरी त्याचा विचार करू नये.
  • नियम ४ :- केव्हा केव्हा असे दिसेल कि १/२/३/४ सूत्रे पाहताना आपल्याला २/२ ग्रह दिसतील आपल्या पत्रिकेत तेव्हा कोणता ग्रह भाग्यकारक असेल ते ठरविण्यासाठी खालील क्रमानुसार तो ग्रह ठरवावा. उदाहरण — समजा आपल्या पत्रिकेत सूत्र क्रमांक १ मध्ये सूर्य आणि शनी दोन्ही ग्रह त्यात त्या त्या ठिकाणी लिहिले असतील तर खालील क्रमवारीप्रमाणे सूर्य हा आधी असेल म्हणून शनी चा विचार करू नये. किंवा समजा सूत्र क्रमांक दोन मध्ये ३ ग्रह आपल्या पत्रिकेत त्यात त्या ठिकाणी असतील तरी खालील क्रमवारीत जो ग्रह पहिला येईल तो घ्यावा. क्रम — गुरु , सूर्य , चंद्र , मंगळ, शुक्र, बुध , राहू , शनी , केतू .

भाग्याचा ग्रह मिळाल्यानंतर होणारे फायदे

  • हा ग्रह ओळखल्या नंतर ह्या ग्रहाचा खालील प्रमाणे उपयोग करून घेता येतो.
  • त्या ग्रहाच्या गुणधर्मानुसार आपल्या करिअर ची निवड करता येते.
  • त्या ग्रहाची उपासना केल्याने चांगले फळ मिळते
  • तो ग्रह जेव्हा गोचरीने त्याच स्थानी येतो तेव्हा भाग्य अधिक साथ देते.
  • तो ग्रह वर्षफल कुंडलीत त्याच ठिकाणी आला तर त्या वर्षात अति उत्तम फळे देऊन जातो त्या स्थानाची.

नोट — वरील सर्व माहिती हि लालकिताब च्या नियमातील आहे पारंपरिक किंवा कृष्णमूर्ती पद्धती प्रमाणे पत्रिकेचे नियम येथे लागू पडत नाहीत.

धन्यवाद…..!

Leave a Reply