You are currently viewing शनी मंगळ युती एक क्रांती

शनी मंगळ युती एक क्रांती

वरील कुंडलीत दाखविलेली शनी मंगळ युती हि आपल्या पत्रिकेत कोणत्याही एका स्थानी असेल तर किंवा मंगळाच्या मागील स्थानी शनी असेल तर किंवा कोणत्याही मार्गाने शनी मंगळ दृष्टीने किंवा नक्षत्राने संपर्कात असेल तर खाली दिलेले सर्व काही आपल्या साठी असेल. (जास्तीत जास्त फळे युती वर मिळतील).

ह्या युतीला ज्योतिष शास्त्रातील क्रांती युती ह्यासाठी म्हटले आहे कि जेव्हा जेव्हा देश स्वतंत्र व्हावा ह्यासाठीच्या लढाईत जे जे लोक पुढे सरसावले किंवा ज्यांनी ज्यांनी ह्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली किंवा आमरण उपोषण केले किंवा अमानुष कष्ट घेतले आणि कित्येक लोक लापता झाले त्या सर्वांमध्ये हि युती होती असे माझ्या वाचनात आले आहे.

उदा.:- झाँसी च्या राणी लक्ष्मीबाई च्या पत्रिकेत रवी मंगळाच्या मागे शनी, सेनापती बापट, विष्णू गणेश पिंगळे, साताऱ्याचे क्रांतिकारी नाना पाटील, तात्या टोपे, वासुदेव बळवंत फडके, नानासाहेब पेशवे, उमाजी नाईक,नेताजी शुभाचंद्र बोस, शामजी कृष्ण वर्मा, मादाम कामा पारशी समाज ची निर्वासित महिला जिने भारताचा प्रथम तिरंगा झेंडा देशासाठी निर्माण केला अशा अनेक शूरवीर,क्रांतिकारी, साहित्यकारी, आणि समाजाला आपल्या जीवनाचा अमूल्य हिस्सा देणारे असे अनेकजण ह्या युती प्रतियुती किंवा मंगळाच्या मागे शनी अशा योगात जन्म घेतात.

ह्यावरून माझ्या मते हि युती जीवनात आपल्या पर्सनल सुखाचा विचार न करता काही तरी वेगळे करून दाखवीत असते. म्हणून ह्या युतीत मला गेल्या १४/१५ वर्षात वैवाहिक सुख कुठे दिसलेच नाही. किंवा संसारात राहून सुद्धा वैवाहिक सुखाचा उपभोग करताना व्यक्ती जास्त त्यात रममाण दिसला नाही. एखादा अपवाद सोडता (पत्रिकेचे इतर ग्रहांवरून).

ह्या शनी मंगळाची इतर फळे

 • पूर्वायुष्यात कष्ट. स्थिरता दिसत नाही.
 • पूर्व संपत्तीचा लाभ मिळत नाही.
 • आईवडिलांचे सुख कमी असतील तर त्यांच्याशी मतभेद दिसले.
 • मानसिक त्रास.
 • वैवाहिक सुखात त्रास, मुलं होताना त्रास किंवा मुलगा झाला कि आर्थिक हानी होते.
 • ४० पर्यंत भाग्योदयासाठी धडपड नंतर सुरुवात.
 • हवाई दल, कारखाने, पोलीस, फायर ब्रिगेड जंगल विभाग, राजनीती, यांत्रिकी, ह्यात भरपूर लोक ह्या युतीची मिळतील.
 • ह्यात स्वभाव हुकूमशाही, अधिकार वाणी, कोणी अपमान केला तर हसण्यावर काढतील.
 • छुपे कारस्थान करणारे ह्यात ह्या व्यक्ती दिसत नाहीत सर्व काही खुले असते.
 • अशा युतीत व्यक्तीला कायद्याचा नेहमी त्रास झालेला पहिला गेला आहे. एखादी कोर्ट केस बऱ्याच जणांच्या आयुष्यात पाहिली गेली आहे.
 • ऑपेरेशन किंवा अपघात होण्याचे जास्त प्रमाण ह्या युतीत आहेत.

ह्या युतीतील अशुभ फळे

 • काही वेळा ह्या युतीत असामाजिक तत्वाच्या व्यक्ती पाहण्यात आल्या आहेत.
 • दयामाया नसणारे, जनमानसाला पीडा देणारे, क्रूर, कठोर भाषण करणारे, अति आक्रमक, स्वार्थी, घरात फूट टाकणारे, घुसखोरी करणारे व्यक्ती सुद्धा ह्याच युतीमुळे समाजाला मिळालेले आहेत.

संभवनीय रोग

 • मूत्रपिंड, लिव्हर, कर्करोग, मूत्ररोग, अपेंडिसायटिस, असे काही रोग ज्यात शस्त्रक्रिया ची आवश्यकता असते.
 • वाहन, रेल्वे,प्लेन,जहाज ह्यात अपघात ह्या युतीवर जास्त दिसले नसले तरी मंगळाच्या मागे शनी अशा परिस्थितीत असे होण्याचे प्रमाण जास्त.

प्रत्येक भावात शनी मंगळ युती ची फळे

प्रथम स्थानात ह्या युतीची फळे

१/७/१० म्हणजे मेष तुला मकर राशीत हि युती प्रथम स्थानी असेल तर व्यवसायात पदोन्नती दिसत नाही. भाग्योदय होण्यासाठी धडपड होते अन्य राशीत सुद्धा साधारण फळ सांगितले गेले आहे. निर्व्यसनी, मित्र जास्त, प्रथम स्थानात हि युती असल्यामुळे विवाह स्थानावर ७ वी दृष्टी येते त्यामुळे वैवाहिक सुख कमी होण्याचे प्रमाण जास्त असते. हि युती आरोग्यासाठी इथे चांगली नाही.

द्वितीय स्थानात ह्या युतीची फळे

२,४,६,८,१०,१२ ह्या राशी द्वितीय स्थानात असतील तर पूर्वजीत स्थावर इस्टेटीचा नाश झालेला दिसतो. किंवा असतंच नाही. अन्य ठिकाणाहून जर संपत्ती प्राप्त झाली तर ती सुद्धा टिकत नाही आईचे सुख कमी, कित्येक जणांना मामा मावशी कडे राहावे लागले आहे कुटुंब स्थानातल्या ह्या युतीमुळे द्वितीय स्थानात १० किंवा १ असेल आणि हे दोन्ही ग्रह लिहिले असतील तर ह्याची संभावना जास्त असते. कुटुंब विखरण्याचे प्रमाण ह्या युतीत अधिक असतील कोणत्याही राशीत.

तृतीय स्थानी शनी मंगळ

भाऊ बहिणी राहत नाहीत किंवा असत नाहीत. किंवा त्यांचे सुख कमी. ज्या परिस्थितीत जन्म झाला असेल ती परिस्थिती शेवट पर्यंत पाहिली गेली आहे. भाग्योदयाला अडचणी. कित्येक प्रकारच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते. वयाच्या ४०/४५ वयात पत्नी पासून दुःख मिळण्याचे प्रमाण जास्त. संतती भाग्यशाली असते. पूर्वजीत स्थावर इस्टेट किंवा संपत्ती चा त्याग केल्यावर ह्यांना शांती लाभते. हे सर्व १,४,७,६,१०,११ राशी इथे असतील तर हे होण्याचे प्रमाण जास्त असेल बाकी राशीत शुभ फळे जास्त दिसतील.

चतुर्थ स्थानी शनी मंगळ

जीवनाच्या २६ वर्षापर्यँत कष्ट आईवडिलांचे सुख कमी, दुसऱ्यांच्या घरी राहण्याचा योग जास्त, १/३/१०/११/९ ह्या राशीत हि युती शिक्षण पूर्ण होऊन वकील, किंवा मोठ्या पदावर काम करणारे दिसतील आणि हुकूमशहा म्हणून ह्यांना प्रसिद्धी दिसते. घराणे नष्ट होण्याचे प्रमाण ह्या युतीत जास्त दिसतात.

पंचम स्थानी शनी मंगळ

१/३/५/७/९/११ ह्या राशीत शिक्षण पूर्ण इंजिनिअर वकील गणिती विभाग खाणी शास्त्र ह्यात उत्तम प्रगती होते. ४/८/१२ कर्क वृश्चिक मीन मध्ये दंतविभागात प्रगती होण्याचे प्रमाण जास्त, सरकारी नोकरी मिळते, मिथुन तुला कुंभ (३/७/११) मध्ये छलकपटी पाहण्यात आले आहेत. स्वभाव चांगला नसतो. १/५/९/४/८/१२ स्वभाव शांत परोपकारी असतो. २/६/१० मध्ये हि युती स्वार्थी हट्टी बनवते. कोणत्याही राशीत हि युती संतान प्राप्ती होते पण प्रथम संतती ला त्रास होतो.

षष्ठ स्थानात शनी मंगळ

इथे असणाऱ्या युतीमुळे क्रातींकारी जन्म घेतात जर त्याचे कर्म स्थान आणि धन स्थान बिघडले असेल तर. ह्या युतीत कर्ज होते मोठे कर्ज घेणे आणि परिस्थितीत बदल करणे हा स्वभाव बनतो. इथे हि युती नोकरी साठी उत्तम नाही. फक्त सरकारी नोकरी मिळाली तर मोठ्या पदावर दिसतात. प्रायव्हेट जॉब करणे उत्तम नसते. व्यवसाय करून उदरनिर्वाह चालविण्याचा प्रयत्न असतो. ह्या युतीत कष्ट नसतील तर देहाला त्रास होतात आजारांशी सामना करावा लागतो. त्यामुळे सतत कार्य करत राहावे.

सप्तम स्थानी शनी मंगळ युती

व्यवसाय करताना दिसतात, पार्टनरशिप मध्ये हि युती उत्तम फळे देताना दिसत नाही, नोकरी साठी लांब वास्तव्यास जावे लागते, किंवा जन्मठीकाणी जॉब करताना त्रास पाहिला गेला आहे, पैसा मिळतो, खूप श्रीमंती आली तर वैवाहिक सुखासाठी त्रस्त पाहिले गेले.

जोडीदाराच्या आरोग्यासाठी हि युती उत्तम नाही. हाडांचे लिव्हर चे त्रास पाहण्यात आले आहेत. हि युती असताना इथे लवकर लग्न न करण्याचा सल्ला दिला जातो. करिअर झाल्याशिवाय मुलांनी इथे लग्नाचं पाहू नये. मुलींनी लग्न करताना इथे शक्यतो जोडीदार निवडताना काळजी घ्यावी.
२,३,७,१० ह्या राशीतील हि युती साधारण चांगली फळे देतात. इतर राशीत जास्त काळजी वाटते ह्या युतीची.

अष्टम स्थानी शनी मंगळ युती

जर पूर्वायुष्यात सुख असेल तर नंतर दुःख आणि ह्याउलट पूर्वायुष्यात दुःख असेल तर नंतर सुख प्राप्त होते. पूर्वजीत स्थावर नसते किंवा मिळत नाही. संतती साठी पत्नी चे एखादे ऑपरेशन होण्याचा संभव असतो, संतती होईपर्यंत चिंता लागते नंतर संतती टिकते, फक्त नोकरी करण्याचा योग इथे ह्या युतीत असतो. कुटुंबाकडून लाभ होत नाहीत. कर्क रोग, अपेन्डिस, टायफाईड चा त्रास ह्यापासून सावधान राहावे.

नवम स्थानी शनी मंगळ युती

४/८/१२ मधील जर हि युती असेल तर साधारण परिस्थिती ठीक असते. भाऊ बहीण असतात पण त्यांच्याबरोबर पटत नाही. मोठी बहीण असेल तर जास्त त्रास होतो. ह्या युती पूर्वार्धात भाग्योदयाला त्रास होतो नंतर थोडे सुरळीत होते. प्रवास खूप होतात. वडिलांचे प्रेम मिळणे
कठीण होते किंवा वडील असतील तर त्यांच्या पासून दूर होऊन भाग्योदय होतो.

दशम स्थान शनी मंगळ युती

ह्या स्थानी शनी रवी ची फळे आणि शनी मंगळ ची फळे सारखीच असतात. ह्या युतीवर जन्म घेणारी व्यक्ती हि युती जर ह्या स्थानी असेल तर जास्तीत जास्त श्रीमंत किंवा एकदम दरिद्री सुद्धा पाहण्यात आले आहेत. मोठे अधिकारी, तत्वज्ञ समाजसेवक, लेखक कवी नाटककार, मोठे ज्योतिषी, संशोधक, अशा युतीवर इथे जन्म घेताना दिसतात, समाजासाठी ह्या व्यक्ती जन्म घेतात असे हमखास पाहण्यात येते. राजकारणी लोक सुद्धा ह्यात जास्त दिसतात, तसेच अगदी दुराचारी दुष्ट प्रवृत्तीचे लोक सुद्धा इथे मिळाले.

शनी इथे वंशक्षय देतो आणि तो पितृदोषामुळे होतो. ह्या दोन्ही युत्या दशमस्थानी असतील तर व्यक्तीने ह्या कर्मस्थानातील युतीची चांगली फळे भोगण्यासाठी सतत सामाजिक क्षेत्रात प्रगत असावे इंडिविज्युअल सुखासाठी कर्म करणे म्हणजे स्वतःचा नाश करून घेणे असे माझे स्वतःचे मत आहे. ह्या दोन्ही युत्या शनी मंगळ आणि शनी रवी इथे फार घातक समजू नये मात्र देवाने तुम्हाला काहीतरी करण्यासाठी पृथ्वीवर जन्म दिला आहे एकतर एकदम खालच्या दर्जाचे काम किंवा एकदम वरच्या दर्जाचे काम. निवड तुम्ही करू शकता पण चांगली करावी.

एकादश स्थान (लाभ स्थानी) शनी मंगळ युती

व्यवसायात अधिक लाभ होतात ह्या युतीमुळे. पण अचानक धनप्राप्ती होत नाही. मेहनत जास्त करावी लागते कोणत्याही इच्छा पूर्ण करण्यासाठी. संतती होते पण संतती जाण्याचा योग ह्या युतीत होण्याचे प्रमाण जास्त आहे. संतान सुख कमी, किंवा संतान दुरावा होतो. ३/५/७/११ ह्या राशीत मुले होताना एखादे ऑपरेशन किंवा जास्त चिकित्सा होण्याचा संभव नाकारता येत नाही. पैसा हा त्यासाठीच आलेला दिसतो.

द्वादश स्थानी शनी मंगळ युती

पत्रिकेत चंद्र आणि बुध पाहून ह्या युतीची वाईट फळे दर्शविता येतात जर हे दोन ग्रह बिघडले तर जास्तीत जास्त वाईट फळे पहिली गेली आहेत. नाहीतर हि युती इथे चांगली फळे देतात. संतान होताना त्रास होतो वंश नीट चालत नाही. कायद्याच्या कचाट्यात ह्या व्यक्ती येऊ शकतात. पैसा मिळतो पण तो सतत खर्च होतो. भावंडांचे सुख कमी मिळते. कुटुंबापासून दूर जावे लागते तेव्हा कुठे दिनचर्या सुरळीत होते.

परदेश गमन वारंवार होते पण वयाच्या ३६ नंतर तेथे स्थिरावतात ४२ नंतरच स्वतःच्या प्रॉपर्टीचे सुख प्राप्त होते त्या आधी त्रास होतो.

वरील सर्व स्थानातील शनी मंगळ ची फार कठोर जी जी फळे दिली आहेत ती ती फळे त्यात त्या त्या परिस्थिती वर अवलंबून आहेत.

इथे ह्या युती असणाऱ्यांना एकच सल्ला किंवा उपाय दिला जातो जास्त तिखट खाऊ नये. लाल वस्तू जास्त वापरात असू नये. गणेश आणि हनुमंत उपासना जरूर करत राहावी संसार पूर्ण करण्यासाठी. लहान मुलांच्या पत्रिकेत अशी युती दिसली तर त्यांना सामाजिक क्षेत्रासाठी तयार करावे. आणि त्यांना जास्त स्वार्थी बनवू नये. नाहीतर ह्या युतीची फळे चांगली नसतील त्यांच्या इंडिविज्युअल सुखासाठी.

धन्यवाद…..!

Leave a Reply