You are currently viewing सर्व पितृ अमावस्या- 25 सप्टेंबर 2022

सर्व पितृ अमावस्या महत्व

पूर्ण पितृ पक्षातील शेवटचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्या. पूर्ण पितृ पंधरवड्यात जर काही कारणास्तव कोणी श्राद्ध करू शकला नसेल तर अशा सर्वानी ह्या दिवशी आपल्या पितरांचे श्राद्ध विधी करून घ्यावे असा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्या.

ज्या पितरांचे निधन हे अमावस्या ला झाले असेल अशा पितरांसाठी ह्या दिवशी श्राद्ध कर्म केले जाते. ह्या अमावास्येला सर्व पितरांसाठी श्राद्ध कर्म केल्याने एकाच वेळी सर्व पितरांना गती मिळते आणि त्याचा वैकुंठ प्रवास सुलभ होतो.

अशीही मान्यता आहे कि सर्व पितर हे आपली सेवा घेण्यासाठी पितृपंधरवाड्यात आपल्या जवळ असतात आणि ह्या पितृ अमावास्येला आपल्याला आशीर्वाद देऊन ते आपल्या पुढील गतीला निघून जातात. तेव्हा ह्या दिवशी जे जे आपल्या पितरांना आवडते ते ते त्यांना पुरविले जाण्याची परंपरा ह्या श्राद्ध कर्मात आलेली असावी.

काय काय करू शकतो ह्या अमावास्येला ज्याने पितरांना मोक्ष, गती, तृप्ती मिळेल आणि ते आशीर्वाद देऊन जातील.

सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे. सूर्याला तांब्याच्या लोटीतून जल अर्पण करावे आणि संकल्प करावा कि आज मी माझ्या पितरांसाठी कर्म करणार आहे तर त्यांनी मला आशीर्वाद देऊन समाधानी होऊन त्यांच्या पुढील गतीस त्यांनी प्रारंभ करावा.

नंतर एक लोटा जल पिंपळाला अर्पण करावे. नित्य देवपूजा झाली कि पितरांना तर्पण द्यावे. घरात पितरांच्या आवडीचे पदार्थ बनवावेत ह्यात खास खीर वडे किंवा पुरी अवश्य बनवावी.

अग्नी, घरातील देव, गाय, कावळा ह्यांना पाने काढावीत त्यात सर्व पदार्थ ठेवावेत जे जे आपल्या क्षमतेने बनविलेले असतील.

अग्नी आणि घरातील देव ह्यांना प्रथम नैवेद्य दाखविणे, व्यवस्था असेल तर लगेच गायीला सुद्धा पान देऊन येणे आणि नंतर घरा बाहेर कावळ्याला ते अन्नाचे ताट ठेवावे पाणी सोडून नमस्कार करावा आणि आपल्या गेलेल्या पितरांची आठवण करून क्षमायाचना करावी. आणि नंतर कावळ्याला हाक मारण्यासाठी काव काव असे उच्चारण करावे.

सर्व पितृ अमावास्येला अन्न दान करणे फार महत्वाचे मानले गेले आहे. अशी मान्यता आहे कि ह्या दिवशी केलेले अन्न दान हे आपल्या पितरांना पावते. त्यामुळे ह्या दिवशी दुपारी आपण जेवणा अगोदर घरा बाहेर जाऊन एखाद्या गरिबाला आपल्या घरातील शिजविलेले अन्न जेऊ घालावे.

नंतर सर्वानी एकत्र दुपारचे भोजन आनंदाने करावे. हे सर्व होई पर्यंत घरातील लहान मुलांना उपाशी ठेऊ नये हे खास.

संध्याकाळ झाली सूर्यास्तानंतर कि घराबाहेर एक दिवा जरूर लावावा राई च्या तेलात काळे तीळ घालून तो ज्वलंत दिवा घराबाहे ठेवावा. बाजूला एका छोट्या वाटीत पाणी आणि एक गुळाचा खडा + चण्याची भाजलेली डाळ एक एक चिमटी तरी ठेवावी.

पिंपळाला दिवा राईच्या तेलाचा त्यात काळे तीळ + शंकराच्या देवळात तुपाचा एक दिवा असे दोन्ही मातीचे दिवे घरातून घेऊन जावेत आणि तेथे प्रज्वलित करावे.

रात्री शेवटी झोपताना आपल्या पितरांची आठवण करून विष्णू, कृष्ण, स्वामी समर्थ, किंवा श्री दत्त ह्यांना हाक मारावी आणि आपल्या सर्व पितरांना मोक्ष मिळविण्यास त्यांना मदत करा असे म्हणून निजावे.

ह्यात सर्व घरातील सदस्यांनी एकत्र राहून वरील सोपा विधी पार पाडवा आणि पितरांचे आशीर्वाद घेऊन त्यांना विदा करावे.

वरील कार्यक्रमात आपल्या रितीरिवाजाप्रमाणे प्रांताप्रमाणे बदल असेल तर आपल्या पद्धतीने पितरांची सेवा करावी.

मुहूर्त सर्व पितृ अमावास्येचा

अमावस्या श्राद्ध 25 सप्टेंबर 2022

अमावस्या प्रारंभ 25 सप्टेंबर 2022 पहाटे 3:12 पासून ते 26 सप्टेंबर पहाटे 3:23 पर्यंत असेल.

धन्यवाद…..!

Leave a Reply