You are currently viewing मकर संक्रांती: १४ जानेवारी २०२१

संक्रांती चा अर्थ

मकर संक्रांती- जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा त्या प्रक्रियेला संक्रमण असे म्हणतात. ह्यात सूर्याचे संक्रमण प्रत्येक राशीतून ३० दिवसाने होत असते म्हणून एका वर्षात १२ संक्रांती सूर्याच्या असतात.

प्रत्येक महिन्यात १४/१५/१६ तारखेला सूर्य आपली राशी बदलतोच जेव्हा सूर्य मकर राशीत येतो तेव्हा त्या प्रक्रियेला मकर संक्रांती म्हणून उत्सव साजरा करण्याची परंपरा आली आहे.

ज्योतिष च्या नजरेतून हा योग म्हणजे सूर्य आपल्या मुलाच्या घरात जात आहे. सूर्य आणि शनी हे पिता आणि पुत्राचे नाते आहे. तरी सुद्धा त्यांच्यात शत्रुता होती. जेव्हा शनी आपल्या राशीत आपल्या पित्याचे आदरतिथ्याने स्वागत करतो. तेव्हा पृथ्वीवर हा उत्सव आनंदाने साजरा करतात.

मकर संक्रांतीची दाने व महत्व

शास्त्रात प्रत्येक सूर्याच्या संक्राती ला सूर्याच्या वस्तूंचे दान सांगितले गेले आहे. (गहू गूळ तांबे). पण जेव्हा मकर संक्राती येते तेव्हा त्या दिवशी शनीची आणि सूर्याची दाने एकत्र केल्याने ह्याचे पुण्य फळ आपल्याला मिळते असे सांगितले आहे.

शनी साठी तीळ हे महत्वाचे दान मानले गेले आहे आणि गूळ हे सूर्याचे दान एकत्र करून तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणण्याची परंपरा पिता आणि पुत्र एकाच राशीत येतात आणि त्यांचे शत्रुत्व कमी होत असावे ह्या उद्धेशाने हि परंपरा आली असावी असे मला वाटते.

तीळ गूळ वाटण्याचे वैज्ञानिक कारण ह्या दिवसातील वातावरणाशी सुद्धा असतो. तीळ आणि गूळ हे शरीरा साठी गर्मी निर्मण करण्यास उत्तम मानले गेले आहेत आणि ह्या थंडीच्या दिवसात हे खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा कायम राहते.

ह्या दिवशी काळे तीळ ,तेल, गूळ, गहू, बाजरी, ज्वारी अशी दाने गरिबाला किंवा गायीला जरूर द्यावे ह्याने दान करणाऱ्याला ह्या दोन्ही ग्रहांची चांगली फळे मिळून पुण्यप्राप्ती होते.

सकाळी स्नान केल्यावर ह्या दिवशी सूर्य मंत्राचा जप केला तर पत्रिकेतील सूर्य मजबूत होतो आणि पितरांचा सुद्धा आशीर्वाद मिळण्यास मदत होते.
मंत्र –ॐ घृ‍णिं सूर्य्य: आदित्य: किंवा ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः।

या दिवसाचे अजून एक महत्व म्हणजे ह्याच दिवशी भगीरथ ने कपिल मुनींच्या आश्रमात गंगा आणली आणि ती सागराला मिळविली.

संक्रांतीला प्रत्येक राशीप्रमाणे दाने

 • मेष : गूळ , शेंगदाणे किंवा काळे तीळ
 • वृषभ : सफेद कपडे, दही, किंवा काळे तीळ
 • मिथुन : मूंग डाळ, तांदूळ किंवा घोंगडी (ब्लँकेट्स)
 • कर्क : तांदूळ, चांदी किंवा सफेद तीळ
 • सिंह : तांबा, गहू किंवा सोने, मोती
 • कन्या : खिचड़ी, घोंगडी (ब्लँकेट्स) किंवा हिरवे कपडे
 • तुला : सफेद डायमंड, साखर किंवा घोंगडी (ब्लँकेट्स)
 • वृश्चिक : मूंगा, लाल कपडे किंवा काळे तीळ
 • धनु : पिवळे कपडे, हळकुंड , किंवा सोने
 • मकर : काळी घोंगडी (ब्लँकेट्स), तेल किंवा काळे तीळ
 • कुंभ : काळे कपडे काली उड़द, खिचड़ी किंवा तीळ काळे
 • मीन : रेशमी कपडे, चण्याची डाळ, तांदूळ किंवा काळे तीळ.

मिथुन, तुला — अडीचकी आणि धनु, मकर, कुंभ ला साडेसाती ह्यांनी ह्या दिवशी शनी ची दाने जरूर करावीत.

मकर संक्रांती मुहूर्त आणि तिचे वाहन

पुण्य काळ — दिनांक १४ जानेवारी २०२१ सकाळी ८:१४ ते दुपारी ४:१४ पर्यंत आहे.
ह्या वर्षी श्वेत वर्ण परिधान करून सिंहावर आरूढ होऊन येत आहे. मुख्य वाहन सिंह आहे आणि उपवाहन हत्ती आहे.

महिलांसाठी खास विधी

महाराष्ट्रात परंपरेनुसार सुगड पुजण्याची परंपरा सुद्धा सुवासिनी ह्या दिवशी पार पडतात. ह्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करून देवाजवळ दोन सुगड ठेवले जाते एक लाल रंग (सूर्य) आणि एक काळे रंग (शनी) असे मातीचे सुगड घेऊन प्रत्येक झाडाची ह्या वेळी निघणारी मोहरांची तुरे आणून त्यात भारतात मुंबई किंवा शहरी ठिकाणी त्यात बोर हरभरा शेंगा गाजर वगैरे घालून त्यात तिळगूळ घालून देवापुढे ठेवले जाते.

सुगडाला हळद कुंकू लावले जाते त्याची पूजा केली जाते. ह्यामागे आपल्या घरावर कुटुंबावर संक्रांतीचा वाईट परिणाम होऊ नये अशी प्रार्थना केली जाते. आणि त्यानंतर सवाशिणी एकमेकांना वाण देतात आणि ह्या दिवसापासून हळदीकुंकू चा सुद्धा कार्यक्रम करण्याची पद्धती आहे ती रथसप्तमी पर्यंत असते.

उत्तरायणाची सुरुवात

मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण म्हणजे सूर्य उत्तरायण झाल्याने प्रकृती मध्ये बदलांना सुरुवात होते. थंडीने गारठलेल्या लोकांना सूर्यदेवाच्या उत्तरायण होण्याने थंडीपासून बचाव होण्यास मदत होते. भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील सण-उत्सवाचे पर्व हे शेतीवर अवलंबून आहे.

मकर संक्रांती अशा काळात येते जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक मका, ऊस, शेंगदाणे, उडीद घरी घेऊन येतात. शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते. म्हणूनच मकर संक्रांतीला खरीप हंगामातील पदार्थांनी या पर्वाचे स्वागत केले जाते.

दक्षिणायन देवांची रात्र आणि उत्तरायण देवांचा दिवस मानला जातो म्हणून दक्षिणायन पेक्षा उत्तरायण शुभ मानतात म्हणून स्वतः भीष्माने उत्तरायणाची मृत्यू साठी निवड केली तोपर्यंत ते बाणाच्या शय्येवर होते.

दक्षिणायन पितृयान मानतात उत्तरायण देवयान मानतात. म्हणून इथून शुभकार्यास सुरुवात होते.

राशीप्रमाणे संक्रांतीचे फळ

 • मेष – इष्ट सिद्धी
 • वृषभ – धर्म लाभ
 • मिथुन – शारीरिक कष्ट
 • कर्क – मान सन्मान वाढेल
 • सिंह – भय चिंता
 • कन्या – धन वृद्धी
 • तुला – कलह , मानसिक चिंता
 • वृश्चिक – धनागमन, सुख शांती
 • धनु – धनलाभ
 • मकर – स्थिर लक्ष्मी प्राप्ती
 • कुंभ – लाभ
 • मीन – प्रतिष्ठा उंचावेल.

श्री दत्तगुरु ज्योतिष तर्फे आपणा सर्वाना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

धन्यवाद…..!

Leave a Reply