You are currently viewing नवरात्रीत देवीचे स्वरूप, वर्णन, मंत्र आणि नैवेद्य

नवरात्रीत देवीचे स्वरूप, वर्णन, मंत्र आणि नैवेद्य अश्विन शुद्ध नवरात्री उत्सव २०२१

७ ऑक्टोबर २०२१ प्रथम दिवशी -शैलपुत्री आराधना

ह्या दिवशी देवीच्या पहिल्या स्वरूपाची आराधना केली जाईल. शैलराज हिमालयाची हि कन्या शैलपुत्री म्हणून तिची उपासना ह्या दिवशी होते. हिचे वाहन वृषभ आहे. तिच्या उजव्या हाती त्रिशूल आहे आणि डाव्या हातात कमळ पुष्प आहे. नवरात्रीच्या प्रथम दिवशी योगी आपल्या मूलाधार चक्राला स्थिर करतात. इथूनच त्यांची योगसाधना सुरु होते.

पौराणिक कथेनुसार शैलपुत्री आपल्या पूर्व जन्मी प्रजापती दक्ष च्या घरी कन्या स्वरूपात जन्माला आली. त्यावेळी तिचे नाव सती होते आणि तिचा विवाह हा भोलेनाथ शिव बरोबर झाला होता. एकदा प्रजापती दक्ष ने यज्ञाचे आयोजन केले सर्व देव देवतांना आमंत्रित केले पण आपल्या जावयाला त्यांनी आमंत्रित केले नाही. आपल्या आई बहिणींना आतुर झालेली सती शिवाबरोबर जेव्हा यज्ञ सुरु असताना तेथे आली तेव्हा राजा दक्ष ने शिवाचा अपमान केला आणि त्याला आमंत्रण दिले नसताना येण्याचे कारण विचारले. पतीचा हा अपमान देवी सती सहन करू शकली नाही आणि तिने त्या जळत्या यज्ञात उडी घेतली आणि स्वतःला भस्म करून टाकले. त्याच रागात शिव सतीला आपल्या खांद्यावर तशाच अवस्थेत ठेऊन पूर्ण अवकाशात प्रलाप करत फिरत होते आणि जिथे जिथे तिच्या शरीराचे अवशेष पृथीवर पडले तिथे तिथे आजही ५१ शक्तिपीठाची सेवा होत आहे. नंतर कालांतराने ह्याच सतीने शैलराज हिमालयाच्या घरी कन्या रूपात जन्म घेतला तीच हि शैलपुत्री.

तिथि: अश्विन शुक्ल प्रतिपदा
वाहन : वृष, त्यामुळे हिला वृषारूढ़ा सुद्धा म्हटले जाते
ग्रह: चंद्र – चंद्र ग्रहाला नियंत्रित करण्यासाठी हिची आराधना केली जाते
नैवेद्य — देवीला नैवेद्यात गायीच्या तुपाचा किंवा त्याच तुपाने बनविलेला एखादा पदार्थ दाखवावा
मंत्र- ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं शैलपुत्र्यै नम:।’

८ ऑक्टोबर २०२१ — ब्रह्मचारिणी स्वरूपाची आराधना

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणी ची उपासना आराधना केली जाते. उजव्या हातात कमळाचे फुल, डाव्या हातात कमंडलु असलेले, अनवाणी उभी असलेल्या देवी चे स्वरूप हे प्रेम आणि निष्ठेचे चे प्रतीक आहे. गळ्यात, हातात रुद्राक्ष माळ असलेली हि देवी ज्ञानाचे भांडार असलेली मूर्ती दिसते.

हिची पूजा अर्चना करून मनुष्याला ज्ञान मिळून विजय प्राप्ती होतो तप, त्याग, वैराग्य, सदाचार, संयम ची वृद्धी होते. देवीने बरीच वर्षे अरण्यात राहून तपस्या केली तिने फळ फुलांवर निर्वाह केला , भूमीवर निद्रा केली, नंतर बरीच वर्षे तर तिने फक्त बेल पत्राने निर्वाह केला आणि त्यानंतर तिने ते सुद्धा सोडले. म्हणून हिचे हे स्वरूप साधे पणाचे ज्ञानाचे प्रतीक आहे.
आणि तिचे नाव ब्रह्मचारिणी आहे.

तिथि: अश्विन शुक्ल द्वितीया
ग्रह: मंगळ – मंगळ ग्रहाला नियंत्रित करण्यासाठी हिची उपासना केली जाते.
नैवेद्य —ह्या देवीला खडीसाखर आणि पंचामृत चा नैवेद्य दाखवावा.
मंत्र- ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं ब्रह्मचारिण्यै नम:।’

९ ऑक्टोबर २०२१- देवी चंद्रघंटा आणि देवी कुष्मांडा स्वरूपाची आराधना

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी भगवती दुर्गा देवीच्या चंद्रघंटा स्वरूपाची आराधना होते. डोक्यावर घंटेप्रमाणे अर्धचंद्राकृती आहे. शिवा बरोबर विवाह झाल्यानंतर चे हे स्वरूप आहे. शांतीदायक कल्याणकारी आणि शरीर स्वर्ण रुपी आहे. वाघावर आरूढ झालेल्या ह्या देवी ला दहा हाथ आहेत आणि त्या प्रत्येक हाती वेगवेगळी शस्त्रे आहेत.चारी उजव्या हातात त्रिशूळ गदा, तलवार आणि कमंडलू तसेच वरण मुद्रेत पाचवा उजवा हात आहे. तसेच चारी डाव्या हातात कमळ फूल, तीर, धनुष आणि जप माला तसेच पाचवा डावा हात अभय मुद्रेत आहे. हे रूप पाहता शत्रू असुर राक्षस भयभीत होतात. या देवीची उपासना करून मनुष्याला अध्यात्मिक-आत्मिक शक्ती प्रदान होते. साधकाला सुगंधित सुवास , ध्वनी ची अनुभूती होते.अलौकिक वस्तूंचे दर्शन होते.

तिथि: अश्विन शुक्ल तृतीया
वाहन – वाघ
मुद्रा: शांतिपूर्ण आणि आपल्या भक्तांचे कल्याण करणारी.
ग्रह: शुक्र ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती.
नैवेद्य –-ह्या देवीला दूध किंवा दुधाने बनलेल्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.
मंत्र- ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चन्द्रघंटायै नम:।’

भगवती दुर्गा च्या चौथ्या स्वरूपाचे नाव कुष्मांडा आहे. आपल्या मंद स्मित हास्याने अंड अर्थात ब्रह्माण्डाची योजना हिने केली म्हणून तिचे नाव कुष्मांडा आहे. जेव्हा सृष्टीत चारी दिशेला अंधार होता ती अस्तित्वात नव्हती तेव्हा आई भगवती कुष्मांडा ने आपल्या स्मित हास्याने सृष्टीची रचना केली. अर्थात हि सृष्टी आदी स्वरूपा आदी शक्ती आहे. हिचं निवास सूर्य मंडळातील आतल्या भागात आहे.
सूर्य मंडळात निवास करण्याची क्षमता फक्त हिच्याकडे आहे. हिच्या शरीराची कांती प्रभा सूर्या समान दीप्तिमान आणि भास्कर आहे.
त्यामुळे हिच्या तेजाची तुलना ह्यावरून केली जाते. हेच तेच दाही दिशेला प्रकाशित होत असते. ब्राह्माण्डातील प्रत्येक प्राणीमात्रात जे तेज आहे ती हिचेच देणं आहे.

हि अष्टभुजा आहे. वाघिणीवर आरूढ होऊन हिच्या सात हातात कमण्डलु , धनुष – बाण , कमळ पुष्प, अमृत कलश , चक्र, गदा आहे. आणि आठव्या हातात सर्व सिद्धी देणारी जपमाळ आहे. नवरात्रातील चौथ्या दिवशी हिचे पूजन केल्याने हिच्या भक्तीत तल्लीन झाल्याने समस्त रोग – शोक ह्यांचा विनाश होतो, हिच्या उपासनेने यश बळ आणि आरोग्य मिळते. सर्व प्रकारच्या संकटातून हि मुक्ती देते आणि सुख समृद्धी उन्नत्ती प्राप्त करून देते. अनाहत चक्राला नियंत्रित करण्यासाठी हिची आराधना फलदायी ठरते.

तिथि: देवी कुष्मांडा स्वरूपाची आराधना/अश्विन शुक्ल चतुर्थी
ग्रह: सूर्य – सूर्य ग्रहाला नियंत्रित करण्यासाठी हिची आराधना केली जाते.
नैवेद्य —ह्या देवीला मालपुआ चा नैवेद्य दाखवावा.
मंत्र- ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं कूष्मांडायै नम:।’

10 ऑक्टोबर २०२१ – देवी स्कंदमाता स्वरूपाची आराधना

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आई भगवती दुर्गा च्या स्कंदमाता स्वरूपाची आराधना साधक करतात. स्कंद कुमार कार्तिकेय ची आई म्हणून हिचे हे स्वरूप असल्याने तिला स्कंद हे नाव दिले गेले.हिला चार भुजा आहेत उजव्या हातात कार्तिकेय मांडीवर आहे आणि एक उजवा आणि डावा हात जो वर घेतला आहे त्यात कमळ आहे. एका हाताने आशीर्वाद मुद्रा केली आहे. देवीचा वर्ण पूर्णपणे शुभ्र आहे हिला पद्मासना देवी आणि विद्यावाहिनी दुर्गा देवी सुद्धा संबोधिले जाते. जो कोणी हिची आराधना करतो त्यास कार्तिकेय चा आशीर्वाद प्राप्त होतो. आणि तो धनधान्याने सुखी होतो. आणि हिच्या स्तुती ने मोक्ष मिळतो. हिचे वाहन सुद्धा सिंह आहे.
संतान होण्यासाठी सुद्धा हिची आराधना पूजन केल्याने फलप्राती होते.पिवळ्या फुलाने हिचे पूजन करावे.

तिथि: अश्विन शुक्ल पञ्चमी
मुद्रा: मातृत्व रूप
ग्रह: बुध ग्रहाला नियंत्रित करण्यासाठी हिची आराधना केली जाते.
नैवेद्य –-ह्या देवीला केळ्याचा नैवेद्य दाखवावा.
‘ॐ ऐं ह्रीं क्लीं स्कंदमातायै नम:।’

११ ऑक्टोबर २०२१ –देवी कात्यायनी स्वरूपाची आराधना*

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी आई भगवती दुर्गा चे सहावे स्वरूप देवी कात्यायनी ची आराधना केली जाते. देवी पार्वतीने राक्षस महिषासुराचा वध करताना घेतलेले हे रूप म्हणजेच कात्यायनी स्वरूप आहे. मार्केंडेय पुराणानुसार जेव्हा महिषासुर चे अत्याचार वाढत गेले तेव्हा देवांचे कार्य सिद्ध करण्यासाठी महर्षी कात्यान यांनी तपस्या केली आणि त्यांना प्रसन्न होऊन देवी ने त्यांच्या घरी कन्या स्वरूपात जन्म घेतला आणि हिचे नाव कात्यायनी पडले. सर्वात प्रथम चार भुजा धारण केलेल्या देवीची पूजा स्वतः कात्यान ऋषींनी केली.

मान्यतेनुसार श्री कृष्णाला प्राप्त करण्यासाठी रुक्मिणीने हिची आराधना केली होती.
हिच्या पूजनाने आज्ञा चक्राची प्राप्ती होते. आणि मनुष्य भूलोकात असतानासुद्धा आलौकिक तेज प्राप्त करतो त्याचे सर्व रोग शोक संताप भय नष्ट होतात. विवाहात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी किंवा मनासारखा पती मिळण्यासाठी ह्या देवीची उपासना फलदायी ठरते

तिथि: अश्विन शुक्ल षष्ठी
वाहन : सिंह
अत्र-शस्त्र: चार हाथ – डाव्या हाती कमळ आणि तलवार आणि उजवे दोन्ही हात अभय आणि वरद मुद्रेत आहेत.
ग्रह: गुरु ग्रहाला नियंत्रित करण्यासाठी हिची आराधना केली जाते.
नैवेद्य –-ह्या देवीला मधाचा नैवेद्य दाखवावा.
‘ॐ ऐं ह्रीं क्लीं कात्यायनायै नम:।’

१२ ऑक्टोबर २०२१ –देवी कालरात्री स्वरूपाची आराधना

नवरात्रीच्या सातव्या दिवशी आई भगवती दुर्गा चे सातवे स्वरूप देवी कालरात्री ची आराधना केली जाते. हिचे स्वरूप अति उग्र आहे. वर्ण भडक काळ्या रंगाचा आहे. केश विखुरलेले आहेत, कंठात विजेची चमक आहे. कालरात्रीचे तीन नेत्र ब्रह्माण्ड प्रमाणे गोल आहेत ज्यातून विजेची प्रखरता दिसते. हिच्या नासिका ने श्वास आणि निःश्वास ने अग्नी ची ज्वाला निघत असते.

देवी ला चार भुजा आहेत उजव्या बाजूच्या वरील हाताने भक्तांना वरदान देत आहे. आणि खालील एका हाताने अभय होण्याचा आशीर्वाद देत आहे. डाव्या दोन हाती तलवार आणि खड्ग धारण केले आहे.

हे आईचे भयंकर रूप फक्त पापी आणि पापांचा नाश करण्यासाठी आहे. हे रूप तिने शुंभ आणि निशुंभ ह्या दोन्ही राक्षसांचा वध करण्यासाठी घेतले होते. युद्ध करताना त्याच्या शरीरातून रक्तबीजे जमिनीवर पडून त्यातून पुन्हा दैत्य निर्माण होत होते त्यामुळे ती रक्तबीजे तिने आपल्या मुखात घेण्यास सुरुवात केली आणि त्यांचा वध केला.

देवांनी ह्या स्वरूपाला सुद्धा देवी शुभंकरी असे संबोधले होते. कालरात्री देवी ची उपासना केल्याने मनुष्य आपल्या शत्रू चा नाश करण्यास समर्थ होतो आणि विजय प्राप्ती होते . वाईट शक्तींचे भय राहत नाही ह्या देवीच्या उपासनेने.

तिथि: अश्विन शुक्ल सप्तमी
वाहन: गाढव
ग्रह: शनि ग्रहाला नियंत्रित करण्यासाठी हिची आराधना केली जाते.
नैवेद्य –ह्या देवीला गुळाचा नैवेद्य दाखवावा.
मंत्र- ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं कालरात्र्यै नम:।’

१३ ऑक्टोबर २०२१ –देवी महागौरी स्वरूपाची आराधना

नवरात्रीच्या आठव्या दिवशी आई भगवती दुर्गा चे आठवे स्वरूप देवी महागौरी ची आराधना केली जाते. पौराणिक कथेनुसार महागौरी ने पूर्व जन्मी शिवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली ज्याने तिचे शरीर हे काळे पडत गेले. तेव्हा ह्या तपस्येला प्रसन्न होऊन शिवाने तिच्या पूर्ण शरीरावर शुद्ध गंगाजलाचा शिडकाव केला ज्याने तिची कांती विजे सारखी तेजस्वी झाली आणि वर्ण गोरा झाला ह्यावरून तिला महागौरी असे नाव दिले गेले. हिचे वय आठ वर्ष मानले गेले आहे देवीला चार भुजा आहेत ज्यात एका हाती त्रिशूळ दुसऱ्या हाताची अभय मुद्रा, तिसऱ्या हाती डमरू आणि चौथा हात हा आशीर्वाद मुद्रेत आहे. हिचे वाहन वृष आहे
हिच्या पूजनाने घरात सुखशांती लाभते, अन्नपूर्णा म्हणून सुद्धा हिला पुजले जाते आणि ह्या दिवशी कन्या पूजन सुद्धा होते.
महागौरीच्या पूजनाने मनुष्याची पापे नष्ट होतात आणि मन शुद्ध होते. अपवित्र आणि अनैतिक विचार दूर होऊन मनुष्याला सदमार्ग मिळतो. सफेद वस्त्र परिधान करून हातात सफेद पुष्प घेऊन ह्या देवीची प्रार्थना करतात आणि नंतर तिला ते पुष्प अर्पण केले जाते.

तिथि: अश्विन शुक्ल अष्टमी
नाव : महागौरी तसेच श्वेताम्बरधरा
वाहन: वृष
ग्रह: राहू ग्रहाला नियंत्रित करण्यासाठी हिची आराधना केली जाते.
नैवेद्य –-ह्या देवी ला नैवेद्य म्हणून एक श्रीफळ अर्पण करतात.
मंत्र — ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं महागौर्ये नम:।’

१४ ऑक्टोबर २०२१ –देवी सिद्धिदात्री स्वरूपाची आराधना*

नवरात्रीच्या नवव्या आणि शेवटच्या दिवशी आई भगवती दुर्गा चे नववे स्वरूप देवी सिद्धिदात्री ची आराधना केली जाते.
मार्कंडेय पुराणानुसार माता अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्व और वशित्व ह्या आठ प्रकारच्या शिद्दी प्रदान करणारे हे देवीचे स्वरूप आहे. त्यावरून हिचे नाव सिद्धीदात्री आहे.
हिला चार भुजा आहेत वाहन सिंह आहे हि कमळावर आहे.उजव्या दोन हाती गदा आणि चक्र आहेत डाव्या दोन हाती कमळ आणि शंख शोभायमान आहे.

हिच्या पूजनाने मनुष्याला वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त होतात. हिच्याच कृपेने शिवाने सुद्धा शिद्दी प्राप्त केल्या होत्या हिच्याच अनुकंपा ने शिव शरीर हे अर्धे नारीचे आणि अर्धे शिवाचे आहे जे अर्धनारीश्वर रुपी नावाने ओळखले जाते.
हिच्या पूजनाने व्यक्तीला कार्यक्षेत्री सफलता मिळते, घरातील वस्तू दोष जातो, बाधा मुक्ती साठी हिची आराधना फलदायी ठरते आणि व्यक्ती धन धान्याने पूरक होतो. चमेली ची फुले वाहून ह्या देवीची प्रार्थना करतात ज्याने देवी प्रसन्न होते.

तिथि:अश्विन शुक्ल नवमी
ग्रह: केतु ग्रहाला नियंत्रित करण्यासाठी हिची आराधना केली जाते.
नैवेद्य –-ह्या देवीला तिळाचा नवेद्य दाखविला जातो.
मंत्र- ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं सिद्धिदात्यै नम:।’

साधना

प्रत्येक दिवशी त्यात त्या त्या स्वरूपाचे वर्णन वाचून देवीच्या आराधनेत दिलेला मंत्र जप १०८ वेळा करू शकता आणि त्या दिवसाचा नैवेद्य दाखवू शकता.

आई जगदंबा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच तिच्या चरणी प्रार्थना.

नोट : ९ ऑक्टोबर ला देवीच्या चंद्रघंटा आणि कुष्मांडा दोन्ही स्वरूपाची आराधना असेल तेव्हा दोन्ही नैवेद्य देवीला अर्पण होतील.

धन्यवाद…..!

Leave a Reply