You are currently viewing गुरुपौर्णिमा- ५ जुलै २०२०

शनिवार, ४ जुलै २०२० रोजी सकाळी ११ वाजून ३३ मिनिटांनी आषाढ पौर्णिमा सुरू होणार असून, रविवार, ५ जुलै २०२० रोजी सकाळी १० वाजून १३ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे. भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची पद्धत असल्यामुळे गुरुपौर्णिमा, ५ जुलै २०२० रोजी साजरी केली जाणार आहे. अगदी प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा साजरी करण्याची परंपरा आहे. पूर्वी गुरुकूल पद्धत रुढ होती. गुरुकडून ज्ञानप्राप्ती केल्यानंतर स्वगृही परतण्यापूर्वी गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जात असे, असे सांगितले जाते.

भारतीय संस्कृतीत गुरु ला नेहमीच पूजनीय मानले जाते.

गुरु चे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात फार मोठे असायला हवे. 

जीवन जगत असताना ज्ञान आणि अनुभवाची प्रत्येकाला गरज असते. स्वानुभवातून शिकण्यापेक्षा एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेतल्यामुळे जीवनातील समस्या लवकर सोडवता येतात आणि जीवन सुखी-समाधानी होते. जीवनात गुरुशिवाय तरणोपाय नाही. म्हणूनच जन्म देणारी आई असो अथवा आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे सद्गुरु असोत, शिष्याला गुरुप्रती कृतज्ञता आणि श्रद्धा असणे गरजेचे आहे. यासाठीच गुरुपौर्णिमेचे महत्त्व प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे.

गुरु शब्दाची फोड

‘ग’ कार म्हणजे सिद्ध होय. ‘र’ कार म्हणजे पापाचे दहन करणारा. ‘उ’ कार म्हणजे विष्णूंचे अव्यक्त रूप. तसेच गुरु हाच ब्रह्मा, विष्णू, महेश. हे त्याचे त्रिगुणात्मक रूप आहे.

देव जरी प्रसन्न नसेल तरी चालेल पण गुरु प्रसन्न व्हावा आणि देव जरी रागावला तरी चालेल पण गुरु चा कोप नको ह्याची प्रचिती कशी येते ती गुरुचरित्र अध्यायांत वेळोवेळी सांगितली आहे.

गुरुने दिलेल्या ज्ञानामुळे आपले जीवन यशस्वी झाले यासाठी सतत गुरुबद्दल कृतज्ञ असणे. या कृतज्ञतेपोटी गुरुंची सेवा आणि आदर करणे म्हणजे खरे गुरुपूजन. अशा प्रकारच्या गुरुपूजनातून गुरुला खरी गुरूदक्षिणा मिळत असते. कारण जेव्हा शिष्याची प्रगती होते, तेव्हा ती पाहून गुरुला खरा आनंद होत असतो. खऱ्या गुरुसाठी हा एक प्रकारचा सन्मानच असतो.

महर्षी व्यास मुनी यांची ओळख

भारतीय म्हणून प्रत्येकाला माहित असणे आवश्यक आहे. कृपया पुढील पिढीला काही तरी सांगायला थोडे अपडेट करून घ्या 

महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे.  व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता, त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी महाभारत लिहिले महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ व अलौकिक ग्रंथ. महाभारतात धर्मशास्त्र आहे, नीतिशास्त्र आहे, व्यवहारशास्त्र आहे आणि मानसशास्त्रही आहे. महाभारताची रचना करणारे व्यास त्या कथेशी फार जवळून संबंधित होते. महान ऋषि पराशर यांच्या सहवासात मत्सगंधा नावाच्या कुमारिकेला पुत्रप्राप्ती झाली. त्यांनाच आपण वेदव्यास या नावाने ओळखतो. मत्सगंधा नावाची कुमारिका पुढे हस्तिनापुर राज्याचे राजा शंतनु यांची पत्नी झाली, त्यांनाच आपण देवी सत्यवती या नावाने ओळखतो. देवी सत्यवतीला कौमार्यावस्थेत झालेला पुत्र म्हणजे व्यास पुढे सत्यवती हस्तिनापूरची राणी झाली.

गुरुपौर्णिमा च्या दिवशी व्यासपूजन फार महत्वाचे असते.

गुरुपौर्णिमा – काय कराल उद्या 

आजकालच्या ह्या धकाधकीच्या जीवनात आणि सध्याच्या महामारीच्या वातावरणात गुरुपुर्णिमेच्या ह्या दिवशी जरी काही करता आले नाही तरी आपण आपल्या गुरूला आठवण करून नमन करावे.

त्यांचे ऋण आपल्यावर खूप आहेत असा अविर्भाव मनात आणून शक्य झाल्यास त्यांना काही उपहार सुद्धा देऊ शकता. 

कुणाला आपल्या आयुष्यात गुरु चे स्थान आत्तापर्यंत दिले नसेल तर स्वतःची आई वडील / शिक्षक ह्यांना नमस्कार करावा. दत्त / शिव ह्यांचे पूजन करावे.

गुरुपौर्णिमा – चंद्रग्रहण

उद्याचे चंद्रग्रहण हे उपछाया चंद्र ग्रहण असल्याने कोणतेही धार्मिक नियम पाळू नयेत.

सकाळी ८:३७ ते ११:२२ ला लागणारे हे चंद्र ग्रहण भारतातून दिसणार नाही 

अमेरिका, दक्षिण-पश्चिम यूरोप आणि अफ्रीका च्या काही भागात हे ग्रहण पाहायला मिळेल. त्यामुळे भारतीयांनी सुतक आणि इतर ग्रहणाचे नियम पाळू नयेत.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः l 

गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः ll

This Post Has One Comment

  1. Sanjay Ninave

    Thanks
    Best of luck

Leave a Reply