प्रत्येक महिन्याला २ प्रदोष प्रत्येक १५ दिवसांनी आपल्याला आपल्या कॅलेंडर मध्ये लिहिलेले दिसेल.
Table of Contents
काय आहे प्रदोष
प्रदोष हे एक भगवान शिवाचे व्रत आहे. चंद्र मासात २ वेळा त्रयोदशी असते त्या त्रयोदशी दिवशी हे प्रदोष व्रत करावे असे शास्त्रात सांगितले आहे. ह्यात ह्या दिवशी पूर्ण दिवसभर उपवास करून प्रदोष वेळी शिवाचे पूजन करण्याची प्रथा आहे.
काय महत्व आहे प्रदोषाचे
जो व्यक्ती २६ प्रदोष करेल त्याला कर्ज, शत्रू भय नसेल आणि असेल तर त्यातून लवकर मुक्तता होईल. प्रदोष व्रत केल्याने २ गायी दान केल्याचं पुण्य मिळते असे सांगण्यात आले आहे.
पुराणांतील संदर्भानुसार जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप वाढेल , लोक अधर्मी होतील, लोक नीच कर्म जास्त करण्यात उत्सुक असतील, तेव्हा तेव्हा ज्या व्यक्ती हे सर्व पापे फेडण्यासाठी प्रदोष व्रत करतील त्यांना मोक्ष प्राप्ती होईल. त्याची जन्म जन्मांतरीची पापे नष्ट होतील. सर्व दोष दूर होतील. म्हणून ह्याचे नाव प्रदोष आहे.
माझ्या मते व्यक्तीच्या सर्व दोषांचे हरण करणारे व्रत हे प्रदोष असते. ह्याचा अर्थ असा नव्हे कि पाप केल्यानंतर दोष मुद्दामून निर्माण करून हे व्रत करावे. आपल्या हातून दोष निर्माण होऊच नयेत ह्यासाठी हे व्रत आधीच करून घ्यावे.
प्रदोष चे प्रकार
- भौम प्रदोष : जेव्हा खास मंगळावरी प्रदोष असेल तर त्याला भौम प्रदोष असे म्हणतात. हे व्रत केल्याने पत्रिकेतील मंगळापासून होणारे त्रास दूर होतात उदाहरणार्थ — रिलेशन , कर्ज , विवाह इत्यादी.
- शनी प्रदोष : जेव्हा खास शनिवारी प्रदोष असेल तर त्याला शनी प्रदोष असे म्हणतात हे व्रत केल्याने साडेसाती , लहान पनौती (अडीचकी) , शनी राहू प्रेतशाप, यांसारखे शनी पासून होणारे दोष दूर होतात. मुलांपासून होणारे माता पित्यांना त्रास किंवा गर्भपात होण्याची शंका सुद्धा हे व्रत केल्याने दूर होते. संतान ची इच्छा असणाऱ्यांनी हे व्रत जरूर करावे.
- सोम प्रदोष : जेव्हा खास सोमवारी प्रदोष असेल तर त्यास सोमप्रदोष म्हणतात. हे व्रत केल्याने विवाह , स्त्रियांचे आजार , संतान सौख्य, वैवाहिक तंटे जे पत्रिकेत काही दोषांमुळे निर्माण होतात ते दूर होण्यास मदत होते.
- रवी प्रदोष : जे रविवारी असते. हे व्रत केल्याने आरोग्य सुदृढ राहते.
- बुध प्रदोष : जे बुधवारी असते. हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
- गुरु प्रदोष : जे गुरुवारी असते. हे व्रत केल्याने शत्रू भय राहत नाही
- शुक्र प्रदोष : जे शुक्रवारी असते. हे व्रत केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होऊन सुख लाभते.
प्रदोष काल कसा ओळखावा
सामान्यतः सूर्यास्त च्या अगोदर ४५ मिनिटे आणि नंतर ची ४५ मिनिटे प्रदोष काल मानण्याची पद्धती आहे. पण त्या त्या दिवशीचा प्रदोष काल हा पंचांगाप्रमाणे घ्यावा.
प्रदोष व्रत सामान्य विधी
दिवसभर उपवास करावा. तो आपल्या सामर्थ्यावर असेल.
संध्याकाळी प्रदोष काल पाहून शिवमंदिरात जावे आणि पंचामृताने शिवाला अभिषेक करून बेलपत्र ३/५/७ ह्या संख्येत वाहावे. तेथे ॐ नमः शिवाय चा जप करावा जमेल तेव्हढा.
प्रदोष पौराणिक कथा
प्रदोषात दोष का आणि दोष असेल तर प्रदोष का?
दक्ष प्रजापतीच्या २७ नक्षत्र कन्या होत्या आणि त्यांचा सर्वांचा विवाह हा चंद्रा बरोबर झाला होता. त्यातील रोहिणी नावाच्या पत्नी वर चंद्र फार खुश होता. कारण ती दिसायला फार सुंदर होती. बाकींच्या कन्यांवर हा अन्याय होता. त्या सर्व राजा दक्ष कडे गेल्या आणि आपले दुःख मांडले.
राजा दक्ष ने चंद्राला शाप दिला कि तुला क्षय होऊन तुझ्या सर्व कला हळू हळू कमी कमी होऊन तुला पीडा होईल.
ह्याने चंद्र घाबरून नारदांकडे गेला आणि मग नारदांनी शिवाची उपासना सांगितली. चंद्राने शिवाची उपासना करण्यास सुरुवात केली पण त्याच्या कला ह्या दिवसेंदिवस कमी कमी होत चालल्या आणि अमावसेकडे चंद्र झुकू लागला. तेव्हा अवकाशातील समतोल राखावा ह्या उद्देशाने भगवान शिव चंद्राला प्रसन्न झाले आणि त्याचे दोष दूर केले. आणि मग चंद्राच्या कला हळू हळू वाढू लागल्या आणि पूर्णिमेला पूर्ण चंद्र दिसू लागला पुन्हा. तेव्हापासून दोष दूर होण्यासाठी शिवाची उपासनेची प्रथा सुरु झाली असावी.
तर आपण सुद्धा आपल्या सामान्य जीवनातील काही दोष दूर करण्यासाठी हे व्रत संकल्प करून घेऊन करू शकता.
धन्यवाद…..!