You are currently viewing शरद पौर्णिमा – कोजागिरी पौर्णिमा : 9 ऑक्टोबर 2022

आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.

या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या दिवशी दम्यावरचे आयुर्वेदिक औषध घेण्याची पद्धत आहे. या दिवशी घेतलेले औषध लवकर लागू पडते असा समज आहे.

शरद पौर्णिमा आणि जागरण

अशी आख्यायिका आहे की या दिवशी उत्तररात्री साक्षात लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते व लक्ष्मीदेवी येऊन (संस्कृतमध्ये) ‘को जागर्ति’ (म्हणजे ‘कोण जागत आहे’) असे विचारते, म्हणून या दिवसाला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हणतात.

शरद पौर्णिमा आणि खीर

या दिवशी रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवलेली खीर ज्यात दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून, तसेच साखर घालून, महालक्ष्मी ला नैवेद्य दाखवावा. आणि जिथे चंद्राचा प्रकाश पडेल अशा ठिकाणी अशीच खीर त्यावर चाळणी घालून ठेवावी . चंद्राला ह्याचा नैवेद्य दाखवावा.

तिथे उभे राहून चंद्राकडे पाहून एका चांदीच्या लोटीतून दूध घेऊन अर्ध्य द्यावे. आणि ।। ॐ सों सोमाय नम:।। किंवा ।। ॐ श्रां श्रीं श्रौं स: चन्द्रमसे नम:।। किंवा ।। ॐ ऐं क्लीं सोमाय नम:।। किंवा ।। ॐ श्रीं श्रीं चन्द्रमसे नम:।। जमेल तो मंत्र १०८ वेळा म्हणावा. २०/२५ मिनिटाने किंवा जमेल तर तासाभराने ती खीर नेऊन घरी सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून खावी.

असे केल्याने मानसिक त्रास , घरातील एकोपा, लक्ष्मी ची कृपा प्राप्त होते.(मंत्र जप करण्यास चंद्रासमोर अडचण किंवा व्यवस्था नसेल तर घरी येऊन म्हणावे)

पत्रिकेतील चंद्राचे दोष (केन्द्रुम दोष , चंद्र राहू दोष चंद्र केतू दोष चंद्र निर्बली दोष अमावस्या दोष) ह्यात चंद्राचे जे जे दोष निर्माण होतात त्याचा वाईट प्रभाव कमी होतो. ज्यांना कोणताही मानसिक त्रास आहे त्यांनी वरील कार्यक्रम प्रत्येक महिन्यातील पूर्णिमेला करावा.

शरद पूर्णिमा आणि पिंपळ

शरद पौर्णिमेला मान्यतेनुसार पिंपळाच्या वृक्षाखाली तिचा वास सांगितला आहे त्यासाठी ह्या रात्री एक किंवा ११ दिवे तूप घालून पिंपळाच्या वृक्षाखाली प्रज्वलित करावेत आणि पिंपळाला १/५/११ प्रदक्षिणा कराव्यात जेणे करून आपल्या धनासंबधीतील सर्व त्रास कमी होण्यास मदत होते.

शरद पूर्णिमा आणि महालक्ष्मी मंत्र जप किंवा स्तोत्रे

धनाच्या समस्ये पासून मुक्त होण्यासाठी ह्या रात्री केलेले महालक्ष्मी पूजन मंत्र जप स्तोत्र पठण ह्याला फार महत्व आहे. ज्यांना धनासंबंधित खूप त्रास आहेत त्यांनी जरूर ह्या पौर्णिमेचा लाभ घ्यावा.

खाली काही मंत्र देत आहे जे जमेल त्याची १/५/११/५१/१०८ माळा जाप करू शकता.
जपासाठी कमळगट्टा माळा किंवा स्फटिक माळेवर जप उत्तम. नसेल तर मग रुद्राक्ष तेही नसेल तर सरळ ४० मिनिटे किंवा सव्वा तास जप करून घ्यावा. (श्रद्धेने).

ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ ।।
।।ॐ श्रीं श्रियें नमः ।।
ॐ ह्रीं क्लीं महालक्ष्म्यै नमः ।।
।। ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं सिध्द लक्ष्म्यै नमः ।।

स्तोत्रांमधे — श्री सूक्त , कणकधारा स्तोत्रे हि प्रभावी आहेत. १ किंवा ११ पाठ करू शकता.

वरील प्रयोग करताना तुपाचा दिवा प्रज्वलित करून पूर्वेला मुख करून बसायला लाल आसन लाल वस्त्र अंगावर किंवा परिधान करून बसणे उत्तम फळ देते.

शरद पूर्णिमा आणि आई / पत्नी

ज्यांना पैशाला अजिबात बरकत नाही राहत आहे त्यांनी ह्या दिवशी आपल्या आईला काही तरी चांदी ची भेटवस्तू किंवा एखाद चांदीचा दागिना द्यावा आणि नमस्कार करून तिच्याकडून एका सफेद कपड्यात चिमूटभर तांदूळ घ्यावे आणि ते आपल्या जवळ सतत ठेवावे असे केल्याने धनासंबंधित त्रास कमी होतील. आई नसेल अथवा लांब असेल तर मग पत्नीशी हा प्रयोग करण्यास हरकत नाही.

ज्यांना पैसे भरपूर येत आहेत पण काहीही बरकत राहत नाही त्यांनी ह्या दिवसापासून पुढील वर्षभर खालील प्रयोग नक्की करावा.

सकाळी निघताना आई किंवा पत्नीकडून पैसे मागून घरातून बाहेर पडावे. पण त्यासाठी महिन्यातून एकदा जेव्हा पगार होईल तेव्हा तो आई किंवा पत्नीकडे द्यावा जर ATM मध्ये येत असतील तर त्यातील काही थोडी रक्कम ह्यांच्या हाती द्यावी आणि त्यावर एक पांढरे फुल ठेऊन ते देवघरात ठेवायला सांगावे.

जर तुम्ही व्यवसायिक असाल तर अशीच महिन्याभराच्या उत्पन्नातून काही रक्कम अशीच आणून प्रयोग करावा.
दुसऱ्या दिवशी ती रक्कम आई पत्नीलाच द्यावी. आणि रोज मागावी.

नोट — कोणत्याही प्रयोगाने अगदी श्रीमंत होण्याची अपेक्षा करू नये. हिंदू संस्कृतीत लक्ष्मी सेवा म्हणजे आपण मिळविलेल्या पैशाने सुख मिळावे ते सतत वाढत राहावे हा उद्देश असतो. वरील सर्व प्रयोग हे आपल्याला जरी आपण १००००/- महिना कमवीत असाल तर एक लाखाची मजा देऊन जाईल. नाहीतर जे एक लाख कमवीत आहेत ते दहा हजाराची सुद्धा मजा घेत नाहीत हे मी पत्रिकेत कित्येक वर्षे पाहत आलो आहे म्हणजे त्यांना महालक्ष्मी चा आशीर्वाद नाही असे मी समजतो. (त्यासाठी पत्रिकेत चंद्र आणि शुक्र मजबूत असावे लागतात)

आई महालक्ष्मी आपणा सर्वाना शरद पूर्णिमेच्या रात्री सुख संपन्नतेचा आशीर्वाद देवो हीच श्री हरी चरणी प्रार्थना.

श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्

धन्यवाद…..!

This Post Has 2 Comments

  1. Jayashri Nalawade

    Best 👍 information

  2. Sonal Shinde

    very nice information 👌👌👍

Leave a Reply