Table of Contents
अश्विन शुद्ध नवरात्री उत्सव २०२० : घटस्थापना
शनिवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२० ला अश्विन शुद्ध नवरात्री उत्सवास सुरुवात होत आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र सुरू होते ह्या वर्षी अधिक मास आल्यामुळे पितृपक्ष नंतर लगेच सुरु होणारा हा उत्सव शनिवार पासून सुरु होत आहे. वर्षभरात ४ नवरात्री उत्सव असतात त्यातील ह्या नवरात्रीला शारदीय नवरात्री म्हणतात.
घटस्थापना / कलश स्थापना 2020 : मुहूर्त
१७ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ०६ वाजून २७ मिनिटे ते १० वाजून १३ मिनिटांपर्यंत
त्यातील ८ ते ९:२८ पर्यंत शुभ वेळ आहे. अभिजित मुहूर्त सुद्धा घटस्थापनेचा शुभ समजला जातो हि वेळ दुपारी १२ ते १२:४६ पर्यंत आहे
घटस्थापना विधी
सकाळी स्नान झाल्यावर जिथे आपल्याला घटस्थापना करायची असेल तिथे शुद्धीकरण करून घ्यावे. (गोमुत्राने पुसून घ्यावे गंगाजल शिंपडावे). घराचा उंबरठा सुद्धा स्वच्छ करावा. दरवाजाला आंब्याच्या पाना फुलांचे तोरण बांधावे.
स्वच्छ केलेल्या ठिकाणी चौंरंग किंवा पाट ठेवावा आधी त्याखाली स्वस्तिक किंवा अष्टकमळ रांगोळीने काढून आजूबाजूला सुद्धा रांगोळी काढून घ्यावी. चौरंगावर/पाटावर लाल कापड घालावे. आपल्याकडे दुर्गा देवीचा फोटो किंवा छोटी प्रतिमा असेल तर ती स्थापन करावी.
कलशाची तयारी करावी. हा कलश मातीचा, तांब्या/किंवा पितळेचा सोन्या किंवा चांदीचा सुद्धा असू शकेल. त्याच्या वरील बाजूस गळ्याकडे एक लाल धागा बांधावा. कलशात गंगाजळ आधी टाकून घ्यावे नंतर त्यात पाणी भरावे त्यात एक सुपारी एक नाणे, अक्षता टाकाव्यात. (काही ठिकाणी हळकुंड दुर्वा आणि बऱ्याच काही वस्तू टाकल्या जातात पण ते पाणी ९ दिवसात खराब होण्याची शक्यता असल्यामुळे आणि नंतर ते पाणी आपण आपल्या घरात शिंपडायचे असल्याकारणाने जास्त काही त्यात टाकू नये असे माझे मत आहे).
कलशाला कुंकू पाण्यात मिक्स करून ५/७ ठिकाणी उभे बोटे ओढून घ्यावीत किंवा स्वस्तिक काढावे.
चौरंगासमोर आसन घेऊन बसावे असे बसावे जेणे करून आपले मुख पूर्व किंवा उत्तर असावे.
कलशाची तयारी झाल्यावर प्रथम गणेशाचे आवाहन करावे. त्याआधी स्वतःचे शुद्धीकरण करण्यासाठी ॐ केशवाय नमः ॐ माधवाय नमः ॐ नारायणाय नमः असे उजव्या हाती पाणी घेऊन प्यावे आणि चौथ्या वेळी पुन्हा एकदा पाणी घेऊन ॐ गोविंदाय नमः असे पाणी एका प्लेट मध्ये खाली सोडावे.
तुम्ही जर काही कार्यसिद्धी साठी घट बसवीत असाल तर संकल्प करावा उजव्या हातात पाणी घ्यावे आपले माहीत असलेले गोत्र, कुलदैवत, आपले पूर्ण नाव, आईवडिलांचे नाव घेऊन त्या पाण्याकडे पाहून संकल्प करावा कि ह्या ह्या कार्यसिद्धी साठी मी ह्या घटाची स्थापना करीत आहे तरी कोणतेही विघ्न न येता हे नवरात्रीचे व्रत पूर्ण होऊन माझी कार्यसिद्धी व्हावी.
गणेश आवाहन
दोन विड्याची पाने घ्यावीत त्यावर सुपारी ठेवावी आणि ती घटाच्या समोर किंवा बाजूला ठेवावी. त्या सुपारीला गणेश स्वरूप मानून पूजेला सुरुवात करावी. प्रथम बाजूला एक निरंजन लावावे. सुपारीवर चंदन तिलक, हळद कुंकू दुर्वा एक लाल फुल वाहून गणेश मंत्र म्हणावा.
नंतर फोटो किंवा प्रतिमा देवीची ठेवली असेल त्याला हळद कुंकू वाहून घ्यावे फुले वाहावीत. आणि समोर लाल कपड्यावर तुम्ही आधीच जी तयार केलेली माती ने भरलेली टोपली किंवा ताट ठेवावे.
हि माती साधारण स्वच्छ ठिकाणाहून आणलेली असावी. काळी माती असेल तर उत्तम त्यात सप्तधान्य पेरावे. सालीचे तांदूळ, गहू , मूग वगैरे. त्यावर पुन्हा पातळ मातीचा थर टाकावा. थोडेसे पाणी शिंपडावे.
ह्यात मधोमद देवीच्या कलशाची स्थापना करावी. कलशावर ५/७ विड्याची पाने किंवा आंब्याची पाने लावावीत जेणेकरून पानाची देठे पाण्यात कलशात असावी आणि मागील भाग वर असावा त्यावर एक नारळ ठेवावा. नारळाची शेंडी हि वरील दिशेला असावी. (बाजारात घाटासाठी वेगळे नारळ मिळतात ते घेऊन यावेत). आता जे नित्य ज्योत जी ९ दिवस तेवत असेल असा दिवा नाहीतर समई तेल किंवा तूप घालून प्रज्वलित करून घटाच्या दक्षिण पूर्व ठिकाणी ठेवावी (उजव्या बाजूला घटाच्या). ( वात बनविताना डबल पीळ करून वात बनवावी. त्याची लांबी आपल्या साधारण विते एव्हढि ठेवावी कारण ९ दिवसात ती पुढे पुढे काढता येते.)
नंतर नारळावर स्वस्तिक कुंकवाने काढून घ्यावे. ह्यासाठी अनामिका बोटाचा वापर करावा. हळदी कुंकू अक्षता घटाला आणि तुम्ही ठेवलेल्या देवीच्या प्रतिमेला, घंटी ला शंख ठेवला असेल पूजेत तर त्याला, समई दिवा नित्य पेटणार आहे त्याला वाहावे. फुले वाहून घ्यावीत.
हे करत असताना खालील काही मंत्र म्हणावेत.
ओम अपां पतये वं वारुणाय नमः
गंगे! च यमुने! चैव गोदावरी! सरस्वति!
नर्मदे! सिंधु! कावेरि! जलेSस्मिन् सन्निधिं कुरु।।
ओम दुर्गा दैवे नमः ओम दुर्गा दैवे नमः
घटासमोर ५ प्रकारची फळे, नेवैद्यात सफेद मिठाई ठेवावी किंवा घरातील एखादे गोड पदार्थ ठेवावेत. आणि त्यावरून पाणी सोडावे. देवीला नैवेद्य दाखवावा.
आता देवीची आरती करावी. आरतीला घरातील सर्व मंडळींनी उपस्थिती दाखवावी.
नोट :– वरील विधी हि घटस्थापनेची एक सामान्य विधी आहे. वेगवेगळ्या प्रांताप्रमाणे हि स्थापना पद्धती वेगवेगळी असू शकते, तर आपण आपल्या पद्धतीने पूर्ण श्रद्धेने त्या प्रमाणे स्थापना करू शकता. इथे एक सामान्य विधी दिला आहे त्याची कृपया नोंद घ्यावी.
नऊ दिवसातील महत्व हे नऊ रात्रीचे असते आणि ह्या नऊ रात्रीत आपण देवीची काय काय उपासना असेल. नवेद्य काय दाखवू शकता, आणि अजून नवरात्रीबद्दल , नऊ दिवसातील उपवासाबद्दल काही विशेष माहिती पुढील लेखात भाग २-३-४ मध्ये देण्यात येईल.
धन्यवाद…..!